देवगडातील मत्स्य महाविद्यालयासाठी तातडीने हालचाली

दापोली कृषी विद्यापीठाला संलग्न करण्याच्या मंत्री नितेश राणेंच्या सूचना
Edited by:
Published on: February 11, 2025 11:54 AM
views 161  views

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील नियोजित मत्स्य महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. देवगड मत्स्य विद्यालयाबाबत कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या मंत्रालयातील दालनात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. 

नियोजीत देवगड येथील मत्स्य विद्यालय  नागपूर विद्यापीठाला संलग्न न करता ते दापोली कृषी विद्यापीठाला संलग्न करावे अशी सूचना देऊन सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री  राणे म्हणाले, नागपूर मत्स्य विद्यापीठाकडे यासाठी लागणारा पुरेसा कर्मचारीवृंद नसल्याने अधिक भार टाकू नये.

याबाबत दापोली कृषी विद्यापीठाचे ही म्हणणे ऐकून झाल्यानंतर कृषी मंत्री माणिक कोकाटे यांनी हा विषय कॅबिनेट समोर ठेवून त्यास मान्यता घेण्यात येईल असे आश्वासित केले. पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड येथील मत्स्य विद्यालय लवकरात लवकर कसे सुरू होईल याबाबत संबंधित सर्वच अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा अशी सूचना ही पालकमंत्री श्री राणे यांनी दिली.

कृषीमंत्री श्री कोकाटे यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या या बैठकीस कृषी विभागाचे सचिव विकास रस्तोगी तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, रजीस्टार श्री हळदवणेकर,असिस्टंट रिसर्च अधिकारी कल्पेश शिंदे सहभागी होते.