
दोडामार्ग ; सिंधुदुर्ग जिल्हयातील दोडामार्ग तालुक्यात तिलारी येथे पर्यटनात्मक प्रकल्प उभारून रोजगार निर्मिती करणेबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांना पत्र लिहिलंय. तिलारी खोऱ्यात अँम्युजमेंट पार्कसारखा पर्यावरण पूरक पर्यटन प्रकल्प सुरू होऊन रोजगार मिळावा, यासाठी दोडामार्ग तालुक्यातील युवाई एकवटली असून जोरदार पाठपुरावा करत आहे. याच पार्श्वभूमीवर तालुका भाजपच्या माध्यमातून युवाईने केलेल्या पाठपुराव्यानुसार केंद्रीय मंत्री राणे यांनी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री लोढा यांना पत्र लिहिलंय. याचे तीलारीतील युवाईने जोरदार स्वागत केलं आहे.
केंद्रीय मंत्री राणे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य व गोवा राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तिलारी आंतरराज्य प्रकल्प कार्यान्वित आहे. येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक येतात. सदर प्रकल्पाला लागूनच महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाची सुमारे २०० ते २५० एकर जमीन आहे. या जमीनीचा वापर खालील पर्यटन प्रकल्पांसाठी झाला तरी येथील तरूण तरूणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यासाठी तिलारी येथे
१) तिलारी धरणाच्या जलाशयामध्ये बोटींग प्रकल्प सुरू करणे. २) काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या धर्तीवर उद्यान तयार करणे. ३) हैद्राबादच्या धर्तीवर लेझर शो लुबीन पार्क तयार उभारणे. व ४) म्हैसूरच्या धर्तीवर उद्यान तयार करणे या गोष्टींकडे लक्ष वेधले आहे.
त्यामुळे रोजगारासाठी तिलारीत पर्यटन प्रकल्पांची मागणी करणाऱ्या युवाईन व तालुका भाजपने या पत्राच स्वागत केलं आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी केंद्रीय मंत्री राणे यांचे यासाठी आभार मानले आहेत.