
सावंतवाडी : माजगाव येथील २ महिन्याच्या चिमुकलीचा आज सकाळी दुर्देवी मृत्यू झाला. बालरोगतज्ञ डॉ. संदीप यांनी रेफर केल्यानंतर उपजिल्हा रूग्णालयातून देण्यात आलेल्या एकत्रित डोसमुळे मुलगी गमावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. पाच डोस एकत्रित दिल्यानेच कु.माहीचा मृत्यू झाला असून तीच्या मृत्युबाबत सखोल चौकशी व्हावी, तीच पोस्टमॉर्टम बालरोगतज्ञ डॉ. संदीप सावंत यांनी करु नये, अन्य वैद्यकीय अधिका-यांकडुन पोस्टमॉर्टम व्हावे अशी मागणी अॅड. चंद्रशेखर गावडे यांनी पोलिसांकडे केली आहे.चिमुकलीचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांसह ग्रामस्थांनी उपजिल्हा रूग्णालयात जात डॉक्टरांना धारेवर धरल. पोलीस देखील घटनास्थळी दाखल होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधिक्षक डॉ. रोहिणी सोळंके, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी उपजिल्हा रूग्णालयात धाव घेत परिस्थिती हाताळली. याबाबत डॉक्टरांना विचारणा केली असता डॉ. संदीप सावंत यांनी या प्रकरणावर खुलासा देणं टाळलं. वैद्यकीय अधीक्षक डॉ. दुर्भाटकर यावर बोलतील अस सांगण्यात आल. मात्र, डॉ. दुर्भाटकर ऑपरेशन थियेटरमध्ये असल्यानं शेवटपर्यंत या प्रकरणाचा खुलासा झाला नाही. याप्रसंगी मयत मुलीच्या कुटुंबीयांनी आक्रोष केला. डॉक्टर काय म्हणाले ? असा सवाल पत्रकारांना केला. यावेळी आम्ही सरकारी रुग्णालयात मुलांना आणून चूक करतो का ? खासगी रूग्णालयातचं जाण योग्य होत. आमचा 'जीव' आज आम्हाला नाही झाला असा आक्रोष करत मयत मुलीच्या वडिलांनी हंबरडा फोडला.
माजगाव येथील अनिकेत व सौ. अनुराधा गावडे यांच्या कन्येचा जन्म होवुन दीड महीना झाल्यानंतर पुढील लसीकरण असल्याने 19 डिसेंबर रोजी पुढील लसीकरणाकरीता माहीला उपकेंन्द्र माजगांव येथे पालक घेऊन गेले असता तेथील सीस्टर डॉ. नाईक यांनी सांगीतले की आता हा डोस देऊ नका, बालरोगतज्ञांना कन्सल्ट करतच हे डोस देण्यास सांगीतले. त्याप्रमाणे दिनांक 23 रोजी कु· माही हीला उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे दुपारी 11.30 वा.चे दरम्याने आणले. उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे OPV-1, Penta-1, Rota-1, PCV-1, IPV-1 असे एकुण 5 डोस बालरोगतज्ञ डॉ. संदीप सावंत यांनी देण्याकरीता रेफर केल्याने वरील पाच डोस एकत्रित शुक्रवारी 12.00 वा. चे दरम्याने दिले. त्यानंतर तीला घरी घेवून गेले असता सुमारे तासाभराने माही रडु लागली. डोस दुखत असल्याने ती रात्रीपर्यंत रडत होती. दरम्यान, आज 05.30 वा. चेदरम्यानेसौ. अनुराधा हीने माहीची काही हालचाल होत नसल्याने घरात सांगीतले. त्याप्रमाणे तीला तपासणीकरीता डॉ.दत्तात्रय सावंत यांच्याकडे घेवुन गेले. डॉ. सावंत यांनी तीला तपासुन तीची काहीच हालचाल होत नसल्याने उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संदीप सावंत यांना फोन करुन याबाबत कळविले. त्याप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे सकाळी 08.00 वा. चे दरम्याने घेवुन आले असता तेथे तीला तपासून ती मयत झाल्याचे सांगीतले. वरील पाच डोस एकत्रित दिल्यानेच माही मयत झालेली असावी असे आमचे म्हणणे असुन तीचे मृत्युबाबत पुढील चौकशी व्हावी, तसेच माही हीचे पोस्टमॉर्टम उपजिल्हा रूग्णालायातील बालरोग तज्ञ डॉ. संदीप सावंत यांनी करु नये अन्य वैद्यकीय अधिका-यांकडुन पोस्टमॉर्टम व्हावे अशी मागणी अॅड. चंद्रशेखर गावडे यांनी पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आजही सुविधांचा अभाव आहे. गोरगरीबांना उपचारांसाठी गोवा बांबुळी शिवाय इतर पर्याय उपलब्ध नाहीत. सिंधुदुर्गत उभारलेल्या शासकीय यंत्रणा ह्या अद्याप सक्षम नाहीत. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांची कमतरता, अतिरिक्त कार्यभारामुळे रूग्ण सेवेत येत असणारे अडथळे यामुळे लोकांना जीव गमावावे लागत आहे. सक्षम यंत्रणा नसल्याने जीव जात असून सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा नेमकी सुधरणार कधी ? जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार व जिल्हा प्रशासन यांना जाग येणार कधी ? असा संतप्त सवाल जनतेकडून विचारला जातोय.