
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ३२५ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २२४ ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीने निर्विवाद यश प्राप्त केले आहे. तर मित्रपक्ष असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचेही अनेक सरपंच विराजमान झाले असून महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला आहे. विकासाच्या मुद्द्यावर मतदारांनी भाजपवर विश्वास दाखविला असेल जनतेचा विश्वास सार्थकी लावणार, अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत तेली बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा बँक संचालक तथा अंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, जिल्हा चिटणीस तथा माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, प्रथमेश तेली आदी उपस्थित होते.
राज्यात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाचा झंझावात सुरू आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्यावरच जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिल्याचे या निवडणुकीच्या निकालातून पुन्हा सिद्ध झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमदार नितेश राणे, माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव निलेश राणे, प्रमोद जठार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतलेल्या मेहनतीला या निकालांच्या माध्यमातून यश आल्याचे दिसून आले. यापुढे होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षच नंबर वन ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या निर्विवाद वर्चस्वानंतर आता जिल्ह्याच्या विकासासाठी ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे जास्तीत जास्त निधीची मागणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मुंबई प्रमाणे कोकणचे वेगळे प्राधिकरण करण्याची मागणी केली जाणार आहे. तसेच आंबा, काजू बोर्डसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून त्यातूनही जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांसह शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून व अन्य उद्योगधंद्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार देण्याचाही आमचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.