
देवगड : पारंपारिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळासह येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भेट घेऊन मच्छीमारांचा प्रश्न सोडवू असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी आज पारंपारिक मच्छिमार बांधवांना दिले.
मच्छीमार बांधवांनी आज आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन आपल्या हद्दीत पर्सनेट वाले आक्रमण करतात अशी तक्रार केली यावर आ. नितेश राणे यांनी हा प्रश्न वरिष्ठ स्तरावरच सोडवण्याची गरज असून येत्या नागपूर येथील अधिवेशनात तुमच्यासह मत्स्य व्यवसाय मंत्र्यांची भेट घेऊ असे आश्वासन दिले आहे. यावेळी मच्छीमार आणि आमदार नितेश राणे यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की दैवगड तालुक्यातील पारंपारीक मच्छीमारांनी वारंवार देवगड तालुक्याच्या किनाऱ्या लगत अनधिकृत पर्ससीन मासेमारी मोठ्या प्रमाणात होत आहे. हे निवेदना मार्फत आपल्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या निदर्शनास आणून दिले आहे. या बोटी अनधिकृतरित्या मासेमारी करतात आणि देवगड आनंदवाडी बंदरात मासे उतरतात व याच ठीकाणी नांगरावर असतात या बोटी कुठल्या आहेत व कुठून येतात याची माहिती कुणालाही नाही.
अशाप्रकारच्या अनधिकृत पर्ससीन मासेमारी मुळे आम्हा पारंपारीक मच्छीमाराना मासा मिळेणासा झालाय आणि थोड्याफार प्रमाणात मिळाला तर त्या मासळीला भाव मिळत नाही त्यामुळे आमच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. वारंवार विनंती करूनही आमच्या मागणीला प्रशासना कडून कोणताही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत नाही.
आमदार नितेश राणे यांनी फोनवरून सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी आनंद मालवणकर यांना या निवेदनाचा तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.