
चिपळूण: शहरातील पेठमाप परिसरातील सुभा, कदम, तारा वरचीवाडी आणि खालची बौद्धवाडी या पाच बौद्ध वस्त्यांसाठी असलेल्या स्मशानभूमीतील अत्यंत असुविधाजनक परिस्थितीविरोधात येथील ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ यांनी स्मशानभूमीची तातडीने पाहणी करून वस्तुस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या व नगर पालिकेशी तत्काळ संपर्क साधून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
स्मशानभूमीला जाण्यासाठी सध्या कोणताही योग्य रस्ता उपलब्ध नाही. उभारलेली शेड चुकीच्या पद्धतीने बांधलेली असून ती जीर्ण झालेली आहे. शेजारील नदीमुळे जागेची धूप होत असल्याने संरक्षक भिंतीची गरज व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय अस्तित्वात असलेली शेड देखील दुरुस्त करणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
याच मुद्द्यावर आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीसही उमेश सकपाळ यांनी उपस्थिती दर्शवून, स्मशानभूमीच्या समस्यांबाबत सहकार्याची भूमिका मांडली. “या स्मशानभूमीच्या आवश्यक सुधारणा तातडीने करण्यात येतील आणि नगर पालिकेच्या माध्यमातून योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी आपण सहकार्य करू,” असे आश्वासनही सकपाळ यांनी दिले.
ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागण्या आणि असुविधांमुळे उद्भवलेली ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडून तातडीने ठोस कृती होणे गरजेचे आहे, अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे.