
अरूणाच्या कालव्याचे काम संतप्त उंबर्डे ग्रामस्थांनी रोखले
वैभववाडी: अरूणा धरणाच्या उजव्या कालव्याचे उंबर्डे-कोळपे खिंड येथे सुरू असलेले काम उंबर्डे ग्रामस्थांनी आज (ता.२३)रोखले. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.जमीनमालकांना विश्वासात न घेताच हे काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असुन जोपर्यत जमीन मालकांशी अधिकारी चर्चा करीत नाही तोपर्यत काम सुरू होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.
आखवणे अरूणा धरणाचे काम पुर्ण झाले असुन सध्या कालव्याचे काम सुरू आहे.उजवा आणि डाव्या कालव्याचे प्रमुख काम वगळता इतर कालवे हे पाईपद्वारे केले जात आहेत.दरम्यान उंबर्डे येथे सध्या कालव्याचे काम सुरू आहे.मात्र हे काम करताना स़बंधित यंत्रणेने जमीनमालकांना विश्वासात घेतले नाही.यामुळे येथील माजी ग्रामपंचायत सदस्य काशिम रमदुल यांच्या नेतृत्वाखाली,शाबान देवरूखकर,महमदनिफ रमदुल,रमजान रमदुल,हसल रमदुल,हजिरा देवरूखकर,बिलाल रमदुल,महंमद रमदुल,धोंड्या रमदुल,सरवर रमदुल,रिझवान रमदुल,शेरफुद्दीन रमदुल यांच्यासह इतर ग्रामस्थांनी काम रोखले.जमीन मालकांना कोणतीही पुर्वसुचना न देता कालव्याचे काम कसे काय सुरू करता असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना विचारला.जोपर्यत जमीनमालकांशी चर्चा करीत नाही तोपर्यत काम सुरू होऊ देणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी देत काम रोखले आहे.