ठाकरेंच्या स्वागतासाठी शैलेश परबांनी कसली कंबर

रूपेश राऊळ दाखवणार ग्रामीण भागातील ताकद !
Edited by: विनायक गांवस
Published on: February 03, 2024 15:40 PM
views 120  views

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सावंतवाडीतील ठाकरेंची सेना सज्ज झाली आहे‌. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात उद्या उद्धव ठाकरेंच भव्य स्वागत ते करणार आहेत. गांधी चौक येथे होणाऱ्या सभेच्या निमित्ताने शहरात होर्डिंग्ज, कमानी उभारल्या गेल्या आहेत‌. त्यांच्यावर पुष्पवृष्टी देखील केली जाणार आहे. उबाठा शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी या दौऱ्यासाठी विशेष कंबर कसली आहे. 

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील शिवसैनिकांनी जोरदार स्वागताची तयारी सुरू केली आहे. गांधी चौक परिसरात होणाऱ्या सभेला शिवसैनिकांची मोठी उपस्थितीत असणार आहे. विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब आणि तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी ठाकरेंच्या स्वागताचे शहरात बॅनर लावून जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी शहरात येवून दुपारी सभास्थळाची पाहणी केली. उद्या दुपारी १२ वाजता ठाकरेंचे मोपा विमानतळ येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ठिक १२:४५ वाजता त्यांची सावंतवाडी गांधी चौक येथे सभेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर १:३० वाजता ते कुडाळच्या दिशेने प्रयाण करणार असल्याची माहिती शिवसेना कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. दरम्यान, दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग पोलिसांकडून सावंतवाडीसह कुडाळ, मालवण येथे रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी कॅनवाय घेऊन ही रंगीत तालीम घेण्यात आली.

दरम्यान, दोडामार्ग तालुक्यातील देखील कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, जिल्हा बँक संचालक गणपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दोन हजार ठाकरेंचे शिवसैनिक जिल्ह्याच्या सीमेवर बांदा येथे पक्षप्रमुखांच दणक्यात स्वागत करणार आहे. मोपा विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर बांदानगरीत हे जंगी स्वागत केलं जाणार आहे.