महापरिनिर्वाण दिनी बॅनरही न लावणाऱ्या उद्धव ठाकरेंवर आता आंबेडकरांशी आघाडी करण्याची वेळ !

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांची ठाकरेंवर पुन्हा तोफ !
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 05, 2022 19:34 PM
views 211  views

मुंबई : महापरिनिर्वाण दिनी बॅनरही न लावणाऱ्या उद्धव ठाकरेंवर आता आंबेडकरांशी आघाडी करण्याची वेळ आली आहे, अशी टीका करत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची आज चर्चा झाली. यावेळी आघाडीवर काथ्याकूट झाल्याचे समजते. त्यामुळे केसरकर यांनी ही टीका केलीय.

दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटले आहे की, हिंदुत्व सोडले म्हणून आता वंचितची गरज आहे. ठाकरेंनी आधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली. आता वंचितशी सलगी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता शिवसेनेसोबत जायचे की नाही हे, प्रकाश आंबेडकरांनी ठरवायचे आहे. ते योग्य निर्णय घेतील.

बाबासाहेबांचा वारस चालवत असताना मते कुठे मिळतील, यापेक्षा बाबासाहेबांचा वारसा जपणे हे अधिक महत्त्वाचे असते असा सल्लाही दिला. आम्ही वारसा जपण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत, असे म्हणत दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे.

सीमावाद प्रकरणी बोलताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकचा वाद हा आजचा नाही. 50 वर्षांपासून हा वाद सुरू आहे. बाळासाहेब म्हणाले होते की, सीमाभागातील नागरिकांचे हित जोपासू, हे हित तुम्ही अडीच वर्षे जोपासू शकले नाही, अशी टीकाही केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.