पालकमंत्री उदय सामंतांच्या हस्ते ७५ फूट ध्वजस्तंभाचे लोकार्पण

Edited by: मनोज पवार
Published on: August 29, 2024 14:56 PM
views 91  views

चिपळूण : चिपळूण नगरपालिका हद्दीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, बुरुमतळी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ७५ फुटी ध्वजस्तंभांचे लोकार्पण आज झाले. कोनशिलेचे अनावरण करुन आणि कळ दाबून ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, तहसिलदार प्रविण लोकरे, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शहीद जवानांचे कुटुंबीय, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय आणि माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे, ज्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ७५ फुटी ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. राष्ट्रध्वज उभारत असताना त्याच्यापासून तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे. तरुणांमध्ये कायम देशभक्ती जागृत असली पाहिजे, या भावनेतून नियोजन मंडळाच्या निधीतून हे उभारण्यात येत आहेत. हा कार्यक्रम नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय  महत्वाचा आहे.

आपला राष्ट्रीय ध्वज हा कायमस्वरुपी त्यांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये असला पाहिजे. या ध्वजाचा अवमान होणार नाही, याची देखील दक्षता घेतली पाहिजे. अनेक कार्यक्रम या ध्वजासमोर झाले पाहिजेत. वर्षातून एक दिवस जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांचा राष्ट्र भक्तीपर गीतांचा समूह गाण्याचा कार्यक्रम हा नाविण्यपूर्ण मधून करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही पालकमंत्री श्री.सांमत यांनी यावेळी सांगितले. देशभक्ती जागृत करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम करणे गरजेचे आहे. आज हे सैनिक आहेत म्हणून आपण शांत झोपत आहोत. देशाची सर्वात मोठी ताकद ही आजी आणि माजी सैनिक आहेत, असेही ते म्हणाले. 

आमदार श्री.जाधव आणि आमदार श्री. निकम यांनीही यावेळी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद जवानांचे कुटुंबीय, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय आणि माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांचा यथोचित सत्कार, सन्मान करण्यात आला. तद्नंतर खेड तहसिलदार कार्यालयाच्या आवारतही पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ७५ फुटी ध्वजस्तंभांचे लोकार्पण आज झाले.