पावस ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उद्घाटन

Edited by: मनोज पवार
Published on: August 10, 2024 13:56 PM
views 297  views

रत्नागिरी : गेल्या कित्येक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे. हे आश्वासन पूर्ण करण्याची संधी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मिळाली आहे. या इमारतीमधून जनतेच्या विकासाची कामे व्हावीत, अशी सदिच्छा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

पावस येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन कोनशिला अनावरण करुन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, सरपंच चेतना सामंत, उपसरपंच प्रविण शिंदे, ज्येष्ठ नागरिक दादा देशमुख, माजी सभापती बाबू म्हाप आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले,  विकास कामांना विरोध करणे म्हणजे गावच्या उत्कर्षाला विरोध करण्यासारखे आहे. विधायक, विकासात्मक कामाचं राजकारण हवं. लोकांची मने जिंकायची आहेत. खुर्ची फिरणारी असली तरी, लोकांना फिरवू नका. विकासाचा नवीन कानमंत्र घेऊन नवीन इमारतीमधून सुरुवात करावी, असे पालकमंत्री म्हणाले. 

 सुभाष पावसकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्व माजी सरपंचांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी स्वरुपानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच दीपप्रज्ज्वलनही झाले. कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.