
सावंतवाडी : शहरात शिरोडानाका येथे दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झालेत. तर एक किरकोळ जखमी झाला आहे. ओंकार विजय पांढरे (२३, रा. कोनापाल, निरवडे) व बाबुराव नाईक (२५, रा. कोलगांव) अशी जखमींची नावे आहेत. उदय रेडकर हे किरकोळ जखमी झालेत. अपघातानंतर रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध न झाल्याने पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर यांनी आपल्या दुचाकीने गंभीर जखमी ओंकार पांढरे याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणले. तर नेल्सन फर्नांडिस यांनी बाबुराव नाईक यांना आपल्या दुचाकीवरून रूग्णालयात आणले. यातील ओंकार पांढरे व बाबुराव पाटील या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही तत्काळ अधिक उपचारासाठी गोवा बांबोळीला हलविण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, नेल्सन फर्नांडीस, संदीप हळदणकर, पंकज पेडणेकर, राजू मसूरकर यांनी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला. रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. सावंतवाडी शहराला शासनाच्या माध्यमातून दिलेली रूग्णवाहिका धूळ खात पडली आहे. याबाबत रवी जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.