
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसाठी दोन स्पेशालिस्ट डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. लवकरच उर्वरीत रिक्त पदांवर डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती श्री. केसरकर यांच्या सहकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
यामध्ये पॅथॉलॉजिस्ट डॉ. प्रेरणा पांडुरंगराव गायकवाड यांची जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे तसेच अस्थिरोग तज्ञ डॉ. अजिंक्य रवींद्र वराडे यांची उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दीपक केसरकर यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी यासाठी आरोग्यमंत्र्यांच लक्ष वेधलं होत. लवकरच उर्वरीत रिक्त पदे भरण्यात येणार आहेत अशी माहिती श्री. केसरकर यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पद मंजूर करावी यासाठी सामाजिक बांधिलकी व युवा रक्तदाता संघटनेकडून आंदोलन छेडलं होत. तसेच तालुक्यातील नागरिकांनी देखील याला पाठिंबा दिला होता. आम. दीपक केसरकर यांच्या यशस्वी पाठपुराव्याने या लढ्याला यश आले आहे. तसेच फिजीशीअनसह उर्वरित रिक्त पद भरती प्रक्रियेत लवकरात लवकर भरली जावीत अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच मंत्री आबिटकर, केसरकर यांचे आभार मानले आहेत.