
दोडामार्ग : सासोली गणेश वाडी येथे जमीन आणि रस्त्यावरून झालेल्या वादातून दोन गटांत जोरदार वादावादी व मारहाणीचा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी दोडामार्ग पोलीस ठाणे गाठत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार दोन्ही गटांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सासोली गणेशवाडी येथील फिर्यादी सुनील अर्जुन गवस (६३) यांनी संशयित संकेत प्रशांत सडजी याच्याविरोधात मारहाणीची तक्रार दिली आहे. या तक्रारीत असे म्हटले आहे की संशयिताच्या मालकीच्या जमिनीतून फिर्यादी यांची पूर्वीपासून ये-जा सुरू होती. परंतु या रस्त्यावर स्टील ट्यूबचे गेट लावून तो बंद करण्यात आला. याबाबत विचारणा करताच संशयित आरोपीने शिवीगाळ करत बांबूच्या दांडक्याने डोक्यावर, पाठीवर व दोन्ही पायांवर मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार फिर्यादीने दिली आहे. यानुसार संशयित संकेत प्रशांत सडजीविरोधात भारतीय न्याय संहिता ११८(१), ३५१(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथीलच फिर्यादी प्रज्ञा प्रशांत सडजी (४३) यांनी संशयित सुनील अर्जुन गवस, सुनेत्रा सुनील गवस व सुजय सुनील गवस यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दिली आहे. या तक्रारीत असे म्हटले आहे, प्रज्ञा सडजी यांनी त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये घातलेले जीआयजी स्टील ट्यूबचे गेट सुनील गवस व कुटुंबीयांनी प्रज्ञा सडजी यांना शिवीगाळ करून हलवले. प्रज्ञा सडजी, त्यांचे पती व मुलाने गेट का काढता असे गवस कुटुंबीयांना विचारले असता त्यांनी शिवीगाळ करून गेट काढून टाकणार असे म्हटले. तसेच सुनील गवस यांनी गेटला लावलेल्या लोखंडी राॅडने फिर्यादी यांच्या पतीच्या डाव्या हाताच्या करंगळीला दुखापत केली. तसेच सुजय गवस यांनी तेथील बांबूचा दांड्याने फिर्यादी यांच्या मुलाच्या उजव्या हाताच्या मनगटावर मारून दुखापत केली. तसेच तिन्ही संशयितांनी जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. यानुसार संशयित सुनील गवस, सुनेत्रा गवस व सुजय गवस यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता ११८(१), ३५१(१), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.










