टस्कर तळकट-कोलझर पंचक्रोशीत दाखल ?

Edited by: संदीप देसाई
Published on: June 10, 2023 21:36 PM
views 116  views

दोडामार्ग : तळकट-कोलझर पंचक्रोशीत दाखल झालेल्या भागात हत्तींकडून नुकसान सत्र सुरूच आहे. सुपारी, नारळ व केळी बागायतीचे हे हत्ती मोठ्या प्रमाणात नुकसान करत असून वनखाते या उपद्रवी हत्तींना रोखण्यात अपयशी ठरले आहे. उलट तिलारी खोर्यारतील हत्तींचा मोर्चा आता नारळ फोफळीनी समृद्ध असलेल्या तळकट-कोलझर दशक्रोशीत वळल्याने वन विभागाची डोखेदुखी अधिकच वाढली आहे. दरम्यान त्या भागात गेलेल्या हत्तींचा कळप परतला की त्यांच्या पाठोपाठ टस्कर हत्ती तळकट-कोलझर पंचक्रोशीत दाखल झाला याबाबत शेतकरी व वनविभागात संभ्रमावस्था आहे. 

        तळकट - कोलझर दशक्रोशीत हत्तींनी चार दिवस मुक्काम केल्यानंतर, हत्ती आता कोणत्या दिशेला गेले आहेत याबाबत संभ्रमावस्था आहे. दहा वर्षाच्या कालावधीनंतर तळकट गावात चारच दिवसांपूर्वी हत्तींनी येऊन मनोहर सावंत व चंद्रहास राऊळ यांच्या बागायतीचे नुकसान केले होते. त्यानंतर तळकट कोलझर नदीच्यावर राय ( घनदाट जंगल) या ठिकाणी हत्तींनी बस्तान मांडले. या कालावधीत हत्तींनी तळकट मधील काका राणे, दीपक मळीक, रामदास वेटे, कोलझर येथील महाबळ यांच्या शेती बागायतीचे नुकसान केले होते. हत्ती शेती बागायती आणि गावामध्ये येऊ नये म्हणून वन विभागाच्या मदतीला केर मोर्ले  येथील युवक तसेच तळकट गावातील युवकांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळेच चार दिवस मुक्काम असूनही मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान वाचवण्यात गावकरी यांना यश आले. मात्र या परिसरात हत्तींसाठी पोषक असे वातावरण असल्याने शिवाय मुबलक पाणी, नारळ, केळी, सुपारी बागायती  मोठ्या प्रमाणात असल्याने आता तेथे दाखल झालेले हत्ती कायमचे स्थायिक होतात की काय अशी भीती सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे.  

     शुक्रवारी रात्री अकरा वाजता हत्ती राय या ठिकाणी असल्याचे समजत असले तरी शुक्रवारी  टस्कर केर नीडलवाडी येथे होता, मात्र रात्रीच्या वेळी तो कुठल्या दिशेला गेला हे समजू शकले नाही. त्यामुळे कोलझर गावातील ख्रिश्चनवाडी येथे हत्तींनी केलेले नुकसान  हे तळकट भागात दाखल झालेल्या हत्तींची परतीची प्रवास की नव्याने टस्करचे आगमन याबाबत संभ्रमावस्था कायम आहे.