वायंगणीत कासव महोत्सव..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 23, 2024 05:25 AM
views 142  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालूक्यातील' कासवांचे गाव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वायंगणी बीज येथे 24 ते 25 फेब्रुवारी 2024 दरम्यान कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कासव महोत्सवाचे आयोजन सावंतवाडी वनविभाग आणि समस्त ग्रामस्थ वायंगणी यांच्यावतीने करण्यात आले आहे. या कासव महोत्सवास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

वायंगणी समुद्रकिनारा येथे कासवांच्या प्रजननसाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे वातावरण तसेच कासवांचे अंडी घालणेसाठी अनूकूल अशी जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे दरवर्षी ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे या वायंगणी समुद्र किनारी वाळूमध्ये नैसर्गिक पदधतीने अंडी घालण्यासाठी येतात. निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी ऑलिव्ह रिडले कासवांच्या नवजात पिल्लांना त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करताना पाहण्याची व त्याच्या विषयी अभ्यास करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

या महोत्सवात तज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली कासवाबंददल माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे. तसेच विविध दुर्मिळ समुद्र वन्यजीवांची माहिती पर्यटकांना मिळणार आहे. कासवांचा जीवनक्रम व त्याबाबतचे वैज्ञानिक ज्ञान तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मिळणार आहे. तसेच निसर्गप्रेमींना 'कोकणी रानमाणूस' यांच्या सह कोकणातील स्थानिक लोकांच्या पर्यावरण पूरक जीवनशैली ची अनुभूती घेता येणार आहे. तसेच वायंगणी परिसरातील पारंपारिक घरात राहण्यासह पारंपारिक खाद्य संस्कृतीचा आणि विविध पारंपारिक कला याचा आस्वाद घेण्याची संधी देखील पर्यटकांना मिळेल. निसर्गप्रेमींसह पर्यटकांनी या कासव महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी वनविभाग, व ग्रामपंचायत वायंगणी यांनी केले आहे.

तसेच या महोत्सवानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या हॅचरी मधून जसे की फळीयेफोंडा, सागरतीर्थ, उभादांडा, तोंडवली, तळाशील, आचरा, मोचेमाड, इत्यादी ठिकाणाहून पिल्लांना निसर्गात अधिवासात मुक्त करताना स्थानिक कासवमित्रांच्या मदतीने पाहण्याची संधी निसर्गप्रेमींना माहे मे 2024 पर्यंत मिळणार आहे. त्या करिता संबधित ठिकाणच्या वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची परवानगी आवश्यक राहणार आहे.