
सावंतवाडी : येथील निमिश प्लाझा, कंटक पाणंद, सालईवाडा परिसरात नगरपालिका नळपाणी योजनेतून अत्यंत गढूळ, फेसाळलेले आणि किडेयुक्त पाणी पुरवले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे.
बरेगार यांनी यापूर्वी २५ जुलै २०२५ आणि २७ सप्टेंबर २०२५ रोजी नळपाणी योजनेतून किडेयुक्त पाणी येत असल्याची तक्रार केली होती.
२५ जुलैच्या तक्रारीनंतर किडे आणि पाण्याचे नमुने नेण्यात आले होते, मात्र त्यावर आजपर्यंत काय कारवाई झाली, याची कोणतीही माहिती तक्रारदाराला देण्यात आलेली नाही. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा पाण्यात किडे आढळल्याने तक्रार नोंदवली गेली.
२९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता श्री. लाखे आणि श्री. चितारी नावाचे व्यक्ती, आपण नगरपालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगून पाण्याचा नमुना घेण्यासाठी आले होते. मात्र, बरेगार यांनी त्यांचा हुद्दा आणि ओळखपत्र विचारले असता ते सादर करू शकले नाहीत. त्यामुळे, सक्षम हुद्द्याच्या कर्मचाऱ्यास ओळखपत्रासह पाठवल्याशिवाय नमुना देण्यास त्यांनी नकार दिला. यानंतरही आजपर्यंत नगरपालिकेकडून कोणीही आलेले नाही.
पुन्हा गढूळ, फेसाळलेले पाणी :
काल, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुन्हा नळपाणी योजनेतून सुमारे तासभर फेसाळलेले आणि गढूळ पाणी येत होते, ज्यामुळे बरेगार यांना नाईलाजाने पुन्हा तक्रार करावी लागली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन, किडेमुक्त, गाळमुक्त आणि फेसमुक्त पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी जयंत बरेगार यांनी केली असून, यावर उचित आणि कठोर कारवाई करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पालिकेच्या या दुर्लक्षाबद्दल परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.










