देवगडमध्ये तुलसी विवाह उत्साहात..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 25, 2023 14:24 PM
views 103  views

देवगड : देवगड येथे शुक्रवार सायंकाळ पासून तुलसी विवाहास मोठ्या थाटात सुरुवात झाली आहे. तळवडे येथे तुलसी विवाहासाठी तुळशीवृंदावन नववधू प्रमाणे सजविण्यात आली होती. हिंदू धर्मात तुळशीला खुप अनन्यसाधारण महत्व आहे. स्कंद पुराणात कार्तिक महिन्यात तुळशी पुजेचे महत्व विक्षद करण्यात आले आहे.

देवगड येथील तळवडे गावात शुक्रवार सायंकाळ पासूनच तुळसी विवाहास सुरुवात झाली होती.यासाठी अगोदरच तुळशी रंगरंगोटी करून सजविण्यात आल्या होत्या. देवगड तळवडे भागात तुळशी वृंदावन नववधू सारखे सजविण्यात आले होते. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत तुळशी विवाह घरोघरी केले जातात.

हिंदू धर्मात तुळशी विवाह नंतर विवाह मुहूर्त सुरू होतात. अशी श्रद्धा आहे. की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात. आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.

तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे.बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरासमोर अंगणात तुळशी वृंदावन असते. तुळशी विवाहात आपल्या कडे दिंड्याची काठी वापरली जाते. दिंड्याच्या कोवळ्या पानांची पेस्ट पूर्वीच्या काळी केसांना लावून केस काळेभोर ठेवले जात होते. ते चिरतारुण्याचे प्रतीक आहे. त्याशिवाय या मोसमात तयार होणाऱ्या चिंचा, आवाळे, ऊस यांचाही नैवेद्य तुळशी विवाहात वापरला जातो. चिंचा, आवळे हे ‘क’ जीवनसत्त्व प्राप्त करून देणारे स्त्रोत आहेत. तर ऊस, गूळ, पोहे हे थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला उष्णता प्राप्त करून देतात.त्यासाठी प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोन व पारंपरिक सणांचा कार्यकारणभाव समजून घेऊन सण साजरे केल्याने त्या सण उत्सवामागाचा लपलेला गूढतम प्राचीन आरोग्यवर्धक उद्देश आपल्या लक्ष्यात येतो .