तिलारी धरणाला तिरंगी आरास !

Edited by: विनायक गावस
Published on: August 14, 2023 19:51 PM
views 290  views

सिंधुदुर्ग : भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त तिलारी धरण पाणलोट क्षेत्रात भारतीय राष्ट्रध्वजाची तिरंगी आरास करण्यात आली आहे. धरणाच्या सॅडल डॅम येथील दरवाजातून विसर्ग होणाऱ्या पाण्याला केशरी, पांढऱ्या व हिरव्या रंगाच्या विद्युत रोषणाईने सजवल्याने मनमोहक दृश्य पहायला मिळत आहे. भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा ७५वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा व स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे. 


धरणाचे पाणलोट क्षेत्र, विविध मंदिरे, कार्यालये अशा ठिकाणी अमृत महोत्सवानिमित्त भारतीय ध्वजाची तिरंग्याची आरास करुन उत्सव साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यातील तिलारी येथील आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तिलारी पाटबंधारे प्रकल्प विभागाने भारतीय तिरंग्याची आरास सजविली आहे. सॅडल डॅम येथे धरणाचे चार दरवाजे आहेत. यापैकी तीन दरवाजांवर प्रत्येकी केशरी, सफेद व हिरव्या रंगाची विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याला राष्ट्रध्वजाच्या रंगाप्रमाणे स्वरूप प्राप्त झाले असून हे दृश्य मनमोहक दिसत आहे.