
सावंतवाडी : बांदा-संकेश्वर मार्गावरील आंबोली फणसवाडी येथे आज सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास एका धावत्या कारवर अचानक रस्त्यालगतचे मोठे झाड कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातात कारचे (क्र. GJ-15-CP-5778) मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कारमधील प्रवासी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. झाड थेट मुख्य रस्त्यावर आणि कारवर कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मनीष शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न करून रस्त्यावरील झाड बाजूला केले. झाड हटवल्यानंतर या मार्गावरील रखडलेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे. ऐन गर्दीच्या वेळी पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल वाहनचालक आणि स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.










