बस - दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

महामार्गावरील नांदगाव तिठा येथे अपघात
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: May 17, 2026 22:32 PM
views 49  views

कणकवली : देवगड आगाराच्या एसटी बस आणि दुचाकीचा नांदगाव येथे भीषण अपघात झाला असून, यात  दुचाकीस्वार सलमान सुलतान मुजावर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दिनांक १७ मे २०२६ रोजी सकाळी ८:०५ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर सलमान याला उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवगड आगाराची तांबळडेग ते कणकवली ही एसटी बस नेहमीप्रमाणे सकाळी तांबळडेगहून सुटली होती. सकाळी ८:०५ च्या सुमारास ही बस नांदगाव येथील शेडजवळ आली असता, मुख्य रस्त्यावरून कणकवलीच्या दिशेने वळत होती. याच दरम्यान, कणकवलीकडून देवगडच्या दिशेने अत्यंत भरधाव वेगात येणाऱ्या एका 'एफझेड' (FZ) कंपनीच्या दुचाकीने एसटी बसच्या पुढील डाव्या बाजूच्या चाकाजवळ पाठीमागून येऊन जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत दुचाकीस्वार सलमान मुजावर रस्त्यावर फेकले गेल्याने त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघात घडताच एसटी बसचे चालक मंदार बाळकृष्ण बागवे (३६, रा. मुणगे बांकेवाडी, ता. देवगड) आणि वाहकाने तातडीने गाडी थांबवली. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी सलमानला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवले.

दुचाकीस्वाराने निष्काळजीपणाने व अतिवेगात गाडी चालवल्यामुळेच हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या घटनेची नोंद कणकवली पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.