न.प.सह दरबार हॉलची दार कलावंतांसाठी उघडी !

नगराध्यक्षा श्रद्धाराजेंची ग्वाही ; माजी नगराध्यक्ष साळगावकरांची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: May 17, 2026 22:17 PM
views 64  views

सावंतवाडी : कलावंतांसाठी नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहासह राजवाड्याच्या दरबार हॉलची दारही सदैव उघडी राहतील, अशी ग्वाही नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी दिली.  विदुषी पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षाच्या सांगते निमित्त भोसले- तळीकर प्रतिष्ठान आयोजित ''माणिक मोती'' संगीत मैफिलीवेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या मागणीनंतर नगराध्यक्षा बोलत होत्या. 

स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानकडून 'माणिक मोती' मैफिलेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ' माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आतापर्यंत १४ पर्यटन महोत्सव सावंतवाडीत झालेत. त्या निमित्ताने स्थानिक कलाकारांना व्यासपीठ दिले जायचे, त्यासाठी धोरणही निश्चित केले होते. न.‌प. ही लोकांना सुविधा देणारी संस्था असून बॅ. नाथ पै. सभागृह स्थानिक कलावंतांना विनामोबदला उपलब्ध करून द्यावे. तसेच न.प. च्या संयुक्त विद्यमाने कलाकारांना प्रोत्साहन द्यावे अशी मागणी केली. यावेळी कोकणच्या कलाकारांना प्रोत्साहन द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. स्थानिक कलावंतांना न.प. च्या नाथ पै सभागृहासह राजवाड्याच्या दरबार हॉलचीही दार उघडी राहतील, असा विश्वास नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शि.प्र.मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सदगुरु संगीत विद्यालयाचे संचालक निलेश मेस्त्री, अभिनव संगीत विद्यालयाचे संचालक किरण सिद्धये, सुरश्री संगीत वर्ग संचालिका मंजिरी धोपेश्वरकर, रघुकूल स्वर विहार संचालिका नुतन परब, सोमा सावंत, संजय कात्रे, प्रतिष्ठानच्या मंगल भोसले, मानसी भोसले, गौरव भोसले, प्राजक्ता भोसले, नमिता भोसले, अनिल भोसले, अण्णा देसाई, निरज भोसले, विनायक गांवस आदी उपस्थित होते.