
सावंतवाडी : जिल्ह्यात शाळेतील विद्यार्थ्यांची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ, सिंधुदुर्ग विभागाने जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सिंधुदुर्गचे अध्यक्ष यांच्याकडे केली आहे. संतोष नाईक (कार्याध्यक्ष) आणि सुधीर पराडकर (सहसचिव) यांनी या संदर्भात निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सकाळी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी मारुती व्हॅन, मॅजिक, तीन सीटर रिक्षा, प्रायव्हेट रिक्षा, मारुती इको कार यांसारख्या वाहनांचा सर्रास वापर केला जातो. अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक केली जाते. विशेषतः तीन सीटर रिक्षांमध्ये सहा मुलांची क्षमता असताना दहा ते बारा मुले धोकादायकरित्या नेली जातात. यात ड्रायव्हरच्या बाजूलाही मुलांना बसवले जाते. पालकांना याची कल्पना नसल्याने अपघाताची शक्यता वाढते आणि अशा स्थितीत मुलांची सुरक्षा धोक्यात येते, असा सवाल निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधताना निवेदनात नमूद केले आहे की, क्षमतेपेक्षा जास्त मुले असल्याने अपघात झाल्यास किंवा गाडीला आग लागल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. मुख्य चिंतेचा विषय म्हणजे एलपीजी आणि सीएनजीवर चालणाऱ्या मारुती व्हॅन, रिक्षा आणि मारुती इको कार यांसारख्या वाहनांमध्ये अनेकदा घरगुती गॅस वापरला जातो, कारण एलपीजी गॅसचे पेट्रोल पंप बंद झाले आहेत. अशा वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुले भरल्यास, एखाद्या मोठ्या दुर्घटनेची शक्यता बळावते. परिवहन खात्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशी वाहने मोकाट सुटलेली आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे. शिवाय, शाळेच्या मुलांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आणि परवाने नसतानाही हे काम करणाऱ्या वाहनांवर शासनाने आता कठोर कायदा अंमलात आणला आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाकडे आहेत.
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे आवाहन केले आहे की, त्यांनी या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष घालून, शाळांच्या आवारात किंवा बाहेर धाडी टाकून अशी वाहने जप्त करावीत आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी. या निवेदनावर जाणीवपूर्वक विचार करून शाळेतील मुलांना मोठ्या अपघातांपासून वाचवावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.