
सावंतवाडी : सैनिक स्कूल, आंबोली ह्या शासनमान्य इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इ. ६ वी ते १२ वी विज्ञान पर्यंतचे वर्ग असून ३५० विद्यार्थी देशप्रेमाचे धडे गिरवत आहेत. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात शाळेच्या प्रगतीचा आलेख नेहमीच चढता राहिलेला आहे. अद्ययावत संगणक कक्ष, ग्रंथालय, भोजनकक्ष, ऑबस्टिकल्स कोर्स, फायर रेंज, निवास व्यवस्था आदि सुविधांसह शाळा सुसज्ज होत आहे.
सैनिक शाळा निवासी असल्यामुळे ३५० विद्यार्थी व इतर स्टाफ निवासी राहतात. तसेच हॉस्टेल इमारतीमध्ये अनेक इलेक्ट्रिक उपकरणे आहेत. यासाठी थ्री फेज कनेक्शन घेण्यात आलेले आहे. परंतु थ्री फेज कनेक्शन असून सुद्धा आंबोली सारख्या हिलस्टेशनच्या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात व्होल्टेजमुळे वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय निर्माण होत होती. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे शाळेसाठी जिल्हा नियोजन मधून स्वतंत्र ट्रान्सफार्मर मंजूर करण्यासाठी संस्थेने विनंती अर्ज सादर केलेला होता. या विनंती अर्जाची दखल घेत नितेश राणे, मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांनी नुकताच शाळेसाठी स्वतंत्र ट्रान्सफार्मर मंजूर केलेला आहे. यासाठी संस्थेचे कार्यकारी मंडळ तसेच सैनिक स्कूल, आंबोली शाळेचे कर्मचारी वृंद यांनी आभार व्यक्त केले आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी तसेच संचालक रविंद्र मडगांवकर यांनी विशेष पाठपुरावा केला त्यासाठी त्यांचेही आभार व्यक्त करण्यात येत आहेत.