
दोडामार्ग : दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या उर्मटपणाचा अनुभव तालुक्यातील जनता घेत आहे. बाजारपेठेत थांबलेल्या तरुणांना नाहक मारहाण करून त्यांनी त्याचा कळस गाठला आहे. पोलिसांची प्रतिमा त्यांनी गुंडासारखी बनवली असल्याने तात्काळ त्यांची येथून बदली करावी, अन्यथा सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिकांना घेऊन आंदोलन करावे लागेल असा इशारा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी दिला आहे.
नाडकर्णी पत्रकात म्हणतात ' तालुक्यात आत्तापर्यंत अनेक पोलीस निरीक्षक आले. त्यांनी शिस्त लावण्यासाठी, नागरिकांना न्याय देण्यासाठी प्रसंगी कडक भूमिका घेतली. मात्र सद्या कार्यरत असलेल्या निसर्ग ओतारी यांच्याकडून मनमानी कारभार सुरु आहे. स्वतःला दबंग अधिकारी दाखविण्यासाठी ओतारी सर्वसामान्य नागरिकांकडे दादागिरी करतात. अर्वांच्या व उर्मट भाषा वापरत आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्यांना देखील उडवाउडवीची उत्तरे देणे, दादागिरी करणे, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना देखील अर्वांच्या शब्दात बोलून अपमानित करणे असले प्रकार सुरु आहे. नरकचतुर्थी दिवशी बाजारपेठेत उभ्या असलेल्या गोव्यातील तरुणांना त्यांनी बेदम मारहाण केली. त्यांच्याकडून कोणतीही चूक झालेली नसताना अशा प्रकारे मारहाण करणे म्हणजे गुंडगिरी आहे. काही आक्षेप असेल तर कायदेशीर कारवाई करायला हवी होती. बांदा, दोडामार्ग ह्या बाजारपेठा गोव्याच्या जवळ आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोव्यातील नागरिक येथे येतात. ओतारीच्या गुंडगिरीमुळे आज दोन्ही राज्यांच्या सौहार्दवर परिणाम होऊ शकतो. याप्रकारमुळे पोलिसांची प्रतिमा नकारात्मक बनली आहे. पोलीस ठाण्यात साधी तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकांना देखील त्यांनी अर्वांच्या भाषेत अपमानित केले आहे. गेल्या अनेक वर्षात शांततेत नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाना देखील यंदा त्यांनी नोटीस दिल्या. शोबाज पोलीस अधिकारी अशी त्यांची प्रतिमा बनली आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशीही मागणी नाडकर्णी यांनी केली आहे.










