
कणकवली : गोव्याच्या दिशेने जाणारा अठरा चाकी ट्रेलर उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने पुढे येत हळवल फाटा येथील तीव्र वळणावर पलटी झाला. मंगळवारी दुपारी २.३० वा. सुमारास झालेल्या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे, पोलीस हवालदार श्री. मिठबावकर, वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण, दिलीप पाटील, महामार्ग वाहतूक पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, हवालदार एकनाथ सरमळकर, नीलेश सोनवणे, पोलीस नाईक नितीन शेट्ये, कॉन्स्टेबल रवी हिंदळे, पोलीस कॉन्स्टेबल सागर परब यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
'ते' तीव्र वळण वाहन चालकांसाठी बनली डोकेदुखी
महामार्ग चौपदरीकरण झाल्यापासून हळवल फाटा येथील ते तीव्र वळण नेहमीच अपघातांना निमंत्रण देत आहे. उड्डाणपुलावरून वेगाने येणाऱ्या वाहनांना हे वळण चटकन दिसून येत नाही. परिणामी या वळणावर वाहने कलंडून सातत्याने अपघात होत असतात. यामध्ये कित्येकांना जीवही गमवावा लागला आहे. सदरचे वळण काढून टाकण्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलनेही झाली. मात्र वळण अद्यापही 'जैसे थे'च आहे. हे वळण आणखी किती बळी घेणार आहे? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.