
कुडाळ : सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस तसेच रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशा रितीने वाहने उभी करून ठेवल्या प्रकरणी तीन वाहनचालकांवर शनिवारी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक पोलिस शहरात वाहतूक नियमन आणि पेट्रोलिंग करीत असताना सकाळी 11 वाजताच्या सुमारास कुडाळ गांधी चौक येथे बोलेरो पिक अप MH07 P 2758 हि गाडी चालक विजय मोहन गोसावी (वय 33, रा.पिंगुळी गुढीपूर) याने तेथील रस्त्यावर उभी करून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. 12 वाजताच्या सुमारास उद्यमगनगर येथे कुडाळहून सावंतवाडीकडे जाणा-या रस्त्यावर डंपर GA 09 U 2233 चालक अमर प्रताप सिंग (वय 42, रा.पिंगुळी गुढीपूर) याने वाहतूक अडथळा ठरेल, असा उभा करून ठेवला होता. तसेच 11.30 वाजताच्या दरम्याने पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे चालक संदिपसिंग देसराज (वय 26, रा.कुडाळ) याने आपल्या ताब्यातील छोटा हत्ती टेम्पो MH09 EM 9712 तेथील रस्त्यावर उभा करून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी वाहतूक पोलिस मेघशाम भगत व अमोल बंडगर यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिनही वाहनधारकांविरुद्ध सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल तसेच कोणाही व्यक्तिस धोका निर्माण होईल अशारितीने वाहन उभे करून ठेवल्याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात भादंवि कलम 283 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.