
कुडाळ : कुडाळ शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील गुलमोहर हॉटेल आणि बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यांवर पाणी साचले असून, वाहतूक ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या पाण्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याचबरोबर, शहरातून वाहणाऱ्या भंगासाळ नदीच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर नदीला पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि वस्त्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून, प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.