
मालवण : परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स व अनधिकृत पर्ससीन नौका यांचे अतिक्रमण सुरु असताना मत्स्य व्यवसाय विभागाकडून पुरेशी कारवाई होत नाही. त्यामुळे पारंपारिक मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यलयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. कारवाईचे प्रमाण न वाढल्यास पारंपारिक मच्छिमारांच्या संतापाचा उद्रेक होईल, त्यास मत्स्य विभाग जबाबदार राहील, असा आक्रमक इशारा देण्यात आला.
जिल्ह्याच्या समुद्रात सध्या पर्ससीन नेट नौका, परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स यांचा धुमाकूळ सुरु असून अनधिकृत मासेमारी विरोधात पारंपारिक मच्छिमार सातत्याने आवाज उठवत असून कारवाईची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मत्स्य विभागाकडून दोन दिवसापूर्वी मालवणच्या समुद्रात अनधिकृत मासेमारी करणारे रत्नागिरीचे तीन पर्ससीन ट्रॉलर्स पकडले. मात्र तरीही पर्ससीन व मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर्सचा हैदोस सुरु असल्याने मालवण मधील पारंपारिक मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी मच्छिमार नेते छोटू सावजी, दिलीप घारे, बाबी जोगी, रश्मीन रोगे, जगदीश खराडे, हेमंत मोंडकर, सुजित मोंडकर, सचिन तारी, रवि कोचरेकर आदी उपस्थित होते.
मालवण समुद्रात पकडलेल्या रत्नागिरीच्या पर्ससीन नौका मालवण बंदरात न ठेवता देवगड बंदरात का ठेवण्यात आल्या ? मालवण हे महत्वाचे बंदर असताना यापूर्वीही असे प्रकार मत्स्य विभागाने केले आहेत. यापुढे मालवण तालुक्याच्या सागरी हद्दीत पकडलेल्या नौका मालवण बंदरातच उभ्या कराव्यात. अलीकडच्या काळात अनधिकृत मासेमारी प्रकरणी ज्या कारवाया करण्यात आल्या त्याचा लेखाजोगा सोमवार पर्यंत आम्हाला द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.