फणसगांव होळी उत्सवात पारंपारिक प्रथांचा होतोय जागर

Edited by: लवू परब
Published on: March 23, 2025 15:00 PM
views 219  views

देवगड : देवगड तालुक्यातील फणसगावच्या शिमगावात्सवाची सुरुवात  होळी पौर्णिमेला देव होळी आणि गाव होळी घालून होते. धुलीवंदनाच्या दिवशी श्री देव रवळनाथ मंदिरात पालखी, मानाचे खांब, हबदागिरी, व निशाण सजवून  कापड खेळे शिमग्याचा खेळ खेळत शिमग्याचा जत गायला जातो. त्यानंतर श्री देव महादेव व महालक्ष्मी मंदिरात येऊन पारंपरिक पद्धतीने अन्य देव- दैवतांना निमंत्रित करून पालखी व संपूर्ण देवाचा साज ढोल ताशांच्या गजरात चव्हाट्यावर आणला जातो. चव्हाट्यावर पालखी नाचवली जाते व त्यानंतर गाव होळीच्या समोर जत बोलून गावीक गाऱ्हाण सांगितले जाते. त्यानंतर भाविक भक्तांची गाऱ्हाणी सांगितली जातात. नवीन नवस बोलणे व बोललेले नवस फेडले  जातात. यावेळी मुंबईकर  चाकरमानी मंडळी ही मोठया प्रमाणात उपस्थित असतात. 

दुसऱ्या दिवशी ढोल- ताशा वाजवत पालखी, हबदागिरी व निशाण पाटील वसाच्या मूळ पुरुषाच्या घरी नेली जाते. त्यानंतर देव आपल्या भक्तांच्या भेटीला भक्तांच्या घरी जातात. फणसगाव व विठ्ठलादेवी गाव जरी महसुली दृष्ट्या  वेगळे असले तरी गावऱ्हाटी  एकच आहे. १८ वाड्यांचा गाव असून अनुक्रमे एक- एक वाडीत  घरोघरी पालखी भक्तांना दर्शन देण्यासाठी जाते.  घरी आलेल्या पालखीचे स्वागत करून पालखी , हबदागिरी व निषाणाची विधिवत पूजा करून घरी आलेल्या खेळयांना लाडू, पेढ्याचा प्रसाद वाटला जातो. यावेळी घरी आलेल्या  देवीची ओटी भरण्यासाठी माहेरवाशीणी ही मोट्या प्रमाणात  माहेरी येत असतात. घरी आलेल्या खेळयांना शिमग्याचे पोस ( पैसे)  वाटण्याची प्रथा आहे. पाटील , नागप, आडिवरेकर, नारकर, पेंडूरकर हे पाच मानकरी असून घाडी व गुरव हे देव पुजारी असून देवाची दररोज नित्यनेमाने पूजा करतात. सुमारे १५ दिवसांच्या चालणाऱ्या शिमग्याची सांगता अमावस्येपूर्वी देवाला शिंपण घालून होते.