
वेंगुर्ले : तालुक्यातील वेळागर (शिरोडा) येथे पर्यटनासाठी गेलेले ९ जण समुद्रात बुडाले. यातील दोघांना वाचवण्यात यश आले. तिघांचे मृतदेह सापडले असून चार जण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये पिंगुळी (ता. कुडाळ) मधील मणीयार कुटुंबातील दोघे तर बेळगावमधील कित्तूर कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणे पाचच्या दरम्यान घडली. यातील मृतांमध्ये फरीन इरफान कित्तूर (वय ३४), इबाद इरफान कित्तूर (वय १३ रा. सर्व राहणार लोंढा, ता. खानापूर, जि. बेळगाव), नमीरा आफताब अत्तार (वय १६ रा. अळणावर-जि. कारवार) यांचा समावेश आहे. बेपत्ता असलेल्यांमध्ये इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (वय ३६), इकवान इमरान कित्तूर (वय १५, दोन्ही रा. लोंढा ता. खानापूर, जि. बेळगाव), फराहान महम्मद मणियार (वय २५) जाकीर निसार मणियार (वय १३, दोघे रा. पिंगुळी गुढीपूर, कुडाळ) यांचा समावेश आहे. शिवाय इमरान अहमद मोहम्मद इसाक कित्तूर आणि इसरा इम्रान कित्तूर (वय १७, लोंढा, बेळगाव) हे दोघे या दुर्घटनेतून बचावले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, लोंढा-बेळगाव येथून पिंगुळी-गुढीपूर येथे मणियार कुटुंबियांच्या घरी नातेवाईक शुक्रवारी पिंगुळीत आले. सायंकाळी ५ च्या दरम्यान ते पर्यटनासाठी शिरोड्यात गेले. यातील ९ जण समुद्राच्या पाण्यात हाताची साखळी करून खेळत होते. याच दरम्यान अचानक मोठी लाट आली. या लाटेबरोबर सर्वजण समुद्रात खेचले गेले. किनार्यावर असलेले नातेवाईक व इतर पर्यटकांनी आरडाओरड केला. स्थानिक ग्रामस्थ तथा माजी ग्रामपंचायत सदस्य आजू अमरे, सुरज अमरे, आबा चिपकर, नॅल्सन सोज, समीर भगत तसेच राज वॉटर स्पोर्टसच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उधाण असलेल्या पाण्यात उतरत स्वतःचा जीव धोक्यात घालून बचावकार्य केले. यात इसरा इम्रान कित्तूर व इमरान या दोघांना वाचवण्यात त्यांना यश आले; मात्र उर्वरीत सातही जण समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले. इमरान व इसरा ही अत्यवस्थ झाली होती. त्यांना तातडीने शिरोडा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, उपनिरीक्षक योगेश राठोड, शेखर दाभोलकर, तुकाराम जाधव, कॉन्स्टेबल मनोज परुळेकर, हवालदार प्रसाद कदम, योगेश राऊळ, दीपिका मठकर व पोलीस पथक, होमगार्ड यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार ओंकार ओतारी यांनी घटनास्थळी भेट देत दुर्घटनाग्रस्त कुटुंबाच्या नातेवाईकांशी चर्चा केली. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, उपसरपंच चंदन हाडकी, रेडी सरपंच रामसिंग राणे, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, पंचायत समिती माजी उपसभापती सिद्धेश परब, माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश परब, पांडुरंग नाईक, मयुरेश शिरोडकर, जगन बांदेकर, सुधीर नार्वेकर, सागर नाणोस्कर यांच्यासहित पोलिस पाटील लक्ष्मण तांडेल, पांडुरंग पडवळ, प्राची पेडणेकर, मिताली शेट्ये, सनी मोरजकर, केशव कुडव, बाबुराव चोपडेकर व स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेनंतर किनार्यावर स्थानिकांची मोठी गर्दी उसळली होती. प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले.










