
मंडणग़ड : मंडणगड तहसील कार्यालयातील शेतजमीनीचा फेरफार नोंद करुन तसा सातबारा उतारा देण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी मंगळवारी (27 मे) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या महसूलच्या तिघांविरोधात बुधवारी (28मे) उशिरापर्यंत गुन्हा दाखल व अटकेची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीचे पोलीस उप अधीक्षक अविनाश पाटील यांनी माध्यमांना दिली.
शेतजमिनीचा फेरफार नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी 27 मे 2025 रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत मंडळ अधिकारी म्हाप्रळ अमित शिगवण, म्हाप्रळ ग्राम महसुल अधिकारी (अतिरीक्त कारभार सोवेली सजा) श्रीनिवास श्रीरामे, व उपकोषागार कार्यालय मंडणगड येथील शिपाई मारुती भोसले यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते.
या संदर्भात लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहीतीनुसार सातबारा उतारा संबंधित मंडळ अधिकारी तलाठी यांच्याकडून करून देतो असे सांगून सदर कामाकरिता मारुती भोसले यांनी तक्रारदार यांच्याकडून पन्नास हजार रुपये रकमेची मागणी केली अशी तक्रार तक्रारदाराने केली आहे. तक्रार देण्यापूर्वी यापैकी 45 हजार रुपये मारुती भोसले यांने ऑनलाइन स्वीकारले, परंतु सदरची फेरफार नोंद मंडळ अधिकारी यांनी पूर्ण रक्कम न मिळाल्याने रद्द केल्याने तक्रारदार यांनी दिनांक 27 मे 2025 रोजी मंडळ अधिकारी अमित शिगवण, श्रीनिवास श्रीरामे व मारुती भोसले यांच्या समक्ष भेट घेतली. तेव्हा सदरचा फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अमित शिगवण यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रलंबित काम पूर्ण करून देण्यासाठी दिनांक 27 मे 2025 रोजी पडताळणी दरम्यान तीस हजार रुपये लाच रकमेची मागणी केली. तक्रारदार यांच्याकडून मारुती भोसले याने तीस हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. त्यातील स्वीकारलेल्या लाच रकमेतील स्वतःचा हिस्सा 15500 रुपये स्वतःसाठी ठेवून उर्वरित 14500 रुपयांचा हिस्सा तलाठी श्रीनिवास श्रीरामे यांना दिला. म्हणून तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारली त्यामुळे कारवाई करण्यात आली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तालुक्यातील महसूल विभागाच्या एकाच वेळी तिघांवर लाच घेतल्याप्रकरणी केलेल्या कारवाईने मात्र तालुक्यातील शासकीय विभागाचे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.