जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने मदतीसाठी टोल फ्री '181 महिला हेल्पलाईन सेवा सुरु..!

Edited by:
Published on: September 07, 2023 20:20 PM
views 147  views

सिंधुदुर्गनगरी : केंद्रशासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने निर्गमित केलेल्या मिशनशक्ती या एकछत्री योजनेतील संबल- महिलांची सुरक्षा व संरक्षण या उपाययोजनेअंतर्गत राज्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक ती मदत मिळण्यासाठी टोल फ्री '181 महिला' हेल्पलाईन सेवा जिल्ह्यामध्ये जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर येथे मोफत सेवा सुरु करण्यात आलेल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली.

181 हा महिला हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक सर्व महिलांसाठी 24×7×365 उपलब्ध राहील.  सर्व आपत्कालीन परिस्थितीत महिलांना सर्वतोपरी मदत केली जाईल (उदा.पोलीस सेवा, अग्निशमन सेवा रुग्णवाहीका सेवा आणि  वन स्टॉप सेंटर केंद्र एकाच छताखाली सर्व सुविध उपलब्ध). शासकीय योजना, कार्यक्रम, सुविधांबद्दल माहिती तसेच  आवश्यकतेनुसार हुंडा प्रतिबंधक अधिकारी, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आणि संरक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी 181 महिला हेल्पलाईन कदत करेल. महिला ज्या भागात राहते किंवा नोकरीच्या ठिकाणी किंवा कोणत्याही परिसरात तिच्या गरजेनुसार सहायता तात्काळ पुरविली जाईल. 181 ह्या महिला हेल्पलाईन व्दारे महिलांना त्यांचे मानसिक- सामाजिक समुपदेशन, कायदेशीर मदत, आणि सशक्तीकरण विकास (कौशल्य, शिक्षण, आर्थिक समावेशन, उद्योजकता ई.) विविध संस्थात्मक आणि  योजनाबध्द सेटअपशी जोडण्यासाठी मार्गदर्शन व मदत केली जाईल. 181 महिला हेल्पलाईन वर कोणतीही व कोणत्याही वयोगटातील संकटग्रस्त व हिंसाग्रस्त महिला संपर्क साधु शकते.

महिला हेल्पाईन सेवा क्रमांक 181 क्रमांक 24×7 कार्यरत असणाऱ्या टोल फ्री क्रमांकावर पिडित महिला कॉल करुन माहिती देऊ शकते, माहीती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येते, तरी पिडित महिलेस मदत मिळण्याकरिता महिला हेल्पलाईन 181 या  क्रमांकाव संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री.रसाळ यांनी केले आहे.