सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील ओसरगाव टोलनाक्यावर टोल वसुलीसाठीची निविदा तिसऱ्यांदा मंजूर झाली आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडून झालेल्या कार्यवाहीनुसार ओसरगाव टोल वसुलीसाठी कंपनी निश्चित झाली असून 1 जूनपासून टोलवसुलीची 'वर्कऑर्डर' मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय पक्षांचा या टोलवसुलीला विरोध असून पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
सर्वच पक्षांनी टोलवसुलीला विरोध केला आहे. सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना टोलमुक्ती तसेच अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करुन मगच टोलवसुली करावी, अशी भूमिका घेण्यात आली. त्यानंतर ही टोलवसुली रखडली होती. आता पुन्हा नवीन तारीख निश्चित करण्यात आली असून यावेळचाही मुहूर्त साधता येईल का हे पाहणे आवश्यक आहे.