
पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे उठायचं. वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. कोण सायकलवरुन तर कोण चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मान दिन.
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस २०१८ पासून 'वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा होत आहे. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम हे एक थोर शास्त्रज्ञ म्हणून सर्वत्र परिचित आहेत. मात्र बालपणी आपल्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र वितरणाचेही काम केले होते, हे फारच कमी लोकांना माहिती आहे. स्वत: डॉ. कलाम यांनी आपल्या 'विंग्ज ऑफ फायर' या आत्मचरित्रात याबाबत उल्लेख केला आहे.
वृत्तपत्र विक्रेत्यांचे आपल्या रोजच्या आयुष्यातही एक महत्त्वाचे स्थान आहे. आपण झोपेतून उठण्यापूर्वी, रोजच्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे पहाटेच आपल्या घरापर्यंत पोहचवण्याचे काम ही मंडळी अविरतपणे करत असतात, तेही पाऊस, थंडी, वारा याची तमा न बाळगता. या विक्रेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने हा कष्टाचा गौरव करणारा, अभिमानाचा दिवस असल्याच्या भावना आहेत.
एखाद्या दिवशी आपले वृत्तपत्र जर आपल्याला मिळाले नाही तर या कष्टकरी बांधवाला समजून घेऊयात,हे वृत्तपत्र विक्रेता आणि वाटप करणारा केवळ ५० पैसे ते ७५ पैसे मार्जिन वर सेवा देत असतात,दर महिन्याला त्यांचे पैसे आपण वेळेवर देऊन त्यांच्या कष्टाचा सन्मान केला पाहिजे...!