
दोडामार्ग : माणसाचे जीवन हे पिंजऱ्यात बंद केलेल्या पोपटा प्रमाणे आहे. जीवनात बदल घडवण्यासाठी त्यातून कशा प्रकारे बाहेर पडता येईल ही इच्छा तयार होत नाही, तोपर्यंत तो घुटमळत राहाणार. अनेकांना वाटतं आपण सिद्ध पुरूष, साधू-संत बनले पाहिजे. पण तसं शक्य नाही, यासाठी मोठा त्याग करावा लागतो. सिद्ध पुरूष होण्यासाठी स्वतः तील मी पणा, मोठेपणा, अहंकार आणि प्रसंगी संसाराचाही त्याग करण्याची तयारी दाखवली पाहिजे, असा संदेश श्री क्षेत्र सिध्दगिरी महासंस्थान कणेरी मठ कोल्हापूर येथील श्री अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी यांनी दिला.
साटेली भेडशी येथे आयोजित आध्यात्मिक सत्संग सोहळ्यात उपस्थित भक्तांना ते संबोधित करत होते. दोडामार्ग तालुक्यातील , साटेली तसेच मुंबई गोवा येथील काडसिध्देश्वर सांप्रदाय भक्तगण यांच्यावतीने साटेली येथे शनिवारी सायंकाळी अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांचे प्रवचन तसेच आध्यात्मिक सत्संग सोहळा व स्वामी दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काडसिध्देश्वर स्वामी यांनी साटेली गावात श्री देवी सातेरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी गावातील ग्रामस्थानी त्यांचे आदराने स्वागत केले.
त्यानंतर त्यांनी आध्यात्मिक सत्संग सोहळ्यात सहभागी होत उपस्थित शेकडो भक्तांना संबोधित केलं. ते म्हणाले अनेकांची मन बुध्दी जखडून ठेवली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, साधना केली पाहिजे, जीवनात बदल घडवण्यासाठी साधना महत्वाची आहे. भक्ती योग, कर्मयोग, ज्ञानयोग, ही साधने भगवंतावर प्रेम करणारा भक्त उपयोगाला पडतो. देवाची सेवा केल्याचे समाधान मिळते. लोभ मोहमाया, श्रीमती, याचा गर्व कुणी करू नये त्याचे मोठेपण देखील मिरवू नये असे काडसिध्देश्वर स्वामी यांनी सांगून काही उदाहरणे कथेचा आधार घेऊन आपल्या प्रवचनातून मार्गदर्शन करताना दिली.
परमेश्वर सर्वांच्यात वास करत असतो त्याला सर्व समान असतात. जो भक्त आहे. तो भगवंतासमोर फळाची अपेक्षा करणार नाही. साधकाची साधना ही सदाकाळ राहिली पाहिजे, परमात्मा कडून अपेक्षा करुन साधना केली तर यश मिळत नाही. देव देवो, ना देवो पण मनात कधी फळाची अपेक्षा करू नये. वेळ आली की आपोआप सर्व काही मिळून जाते यासाठी भक्ती श्रध्दा जपली पाहिजे, असेही ते म्हणाले.
काही जणांना त्यांच्या सौंदर्याचा अभिमान तर काही जणांना संपत्ती धनाचा मोठेपणा. पण हे कधी गलितगात्र होणार होणार आहे, हातात काठी येणार आहे. तेव्हा अशा धर्मिष्ट माया बंधनातून मुक्त होऊन स्वरुपानंद, अभिमान सोडला पाहिजे. धर्मिष्ट माया बंधनातून मुक्त होऊन साधनेचा मार्ग परमात्मा कडे घेऊन जाणारा आहे. दान धर्म श्रेष्ठ आहे. पण त्या मागे अहंकार असता कामा नये. असे सांगून दान श्रुती राजाचे उदारण त्यांनी भक्तांना दिले. रामदास स्वामीनी म्हटले आहे, सिद्ध पुरुष बनण्यासाठी मनात कुठलाही मोह अहंकार, नसावा भावना शुद्ध असली पाहिजे, आपल्या अंतर आत्मामध्ये परमेश्वराला स्थान दिले पाहिजे. संताचा वेश करून कुणी संत होत नाही. तर यासाठी तर हदयात भक्ती भाव निर्माण झाले पाहिजे. देवाने दिलेले कर्तव्य पार पाडले पाहिजे. संसारात कधी चिकटून राहु नये. कमळ पाण्यात चिखलात राहाते पण ते आपल्या अंगाला कधी चिखल लागू देत नाही. आनंदी राहाण्याची शक्ती ही साधना तसेच या आध्यात्मिक सत्संग सोहळ्यातून प्राप्त होते, असा मोखिक संदेश त्यांनी उपस्थित जनसमुदायाला दिला.
साटेली भेडशी येथे पार पडलेल्या आध्यात्मिक सत्संग सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त काडसिध्देश्वर सांप्रदाय मंडळ मुंबई दोडामार्ग साटेली यांच्या वतीने एकनाथ गवस, प्रकाश म्हामुणकर, प्रमोद महाडीक, आत्माराम जाधव, विश्राम कुबल, अनिल गांधी, सुधाकर गुरव, विजय महाडीक, लक्ष्मण कानडे, प्रदीप गवस, जयवंत मुंगी, राकेश नामदेव धर्णे, सुरेश लाडू सावंत,बुधाजी धर्णे, नारायण मयेकर, श्रीनाथ मयेकर यांनी तसेच सरपंच छाया धर्णे, माजी उपसभापती सुनंदा धर्णे. यांनी विशेष मेहनत घेतली.