LIVE UPDATES

टीजेएसबी सहकारी बँकेच्या कुडाळ शाखेचे नवीन वास्तूत स्थलांतर

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते उद्घाटन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 26, 2026 08:15 PM
views 41  views
TJSB Sahakari Bank Kudal branch

कुडाळ : देशातील चौथ्या क्रमांकाची बहुराज्यीय नागरी सहकारी बँक असलेल्या 'टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड'च्या कुडाळ शाखेचे नवीन आणि अद्ययावत जागेत यशस्वीरीत्या स्थलांतर करण्यात आले आहे. ग्राहकांना अधिक सुलभ, आधुनिक आणि उत्कृष्ट बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.  

कुडाळ पोलीस स्टेशनजवळील, कॉलेज रोडवरील ‘पंढरी’ इमारतीच्या तळमजल्यावर (प्लॉट क्र. २०/२८) या नवीन शाखेचा शानदार उद्घाटन सोहळा सोमवारी (२६ ऑक्टोबर २०२६) सकाळी पार पडला.  

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या शुभहस्ते या नवीन शाखेचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी  निखिल आरेकर, डिजिटल मार्केटिंग व डेव्हलपमेंटच्या सहाय्यक महाव्यवस्थापक स्नेहा फडके, प्रशासन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक शैलेश चित्रे आणि सिंधुदुर्ग प्रादेशिक प्रमुख सचिन कुलकर्णी हे विशेष रूपाने उपस्थित होते. याशिवाय बँकेचे सन्माननीय ग्राहक, वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

स्थानिक नागरिक व उद्योजकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध : एमडी निखिल आरेकर

उद्घाटन प्रसंगी बोलताना बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर म्हणाले, "कुडाळ शाखेचे नवीन जागेत स्थानांतरण हा आमच्या ग्राहककेंद्रित सेवेचाच एक भाग आहे. टीजेएसबी बँकेच्या एकूणच विकास प्रवासात सिंधुदुर्ग जिल्ह्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सुसज्ज सुविधांच्या बळावर कुडाळ व परिसरातील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँक सदैव तत्पर राहील."  

अध्यक्ष शरद गांगल यांच्या नेतृत्वाखाली व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली टीजेएसबी बँक सहकार क्षेत्रातील विश्वासाचा वारसा जपत डिजिटल बँकिंग आणि नावीन्यपूर्ण सेवांद्वारे सातत्याने विस्तार करत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.