
दोडामार्ग : दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त करावा, वन्यप्राण्यांकडून शेतीचे होणारे नुकसान रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर लादलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात, वनरक्षक शुभम वारके यांची तात्काळ बदली करावी आणि नुकसानभरपाईच्या पंचनाम्यांमध्ये झालेल्या छेडछाडीची चौकशी करावी या प्रमुख मागण्यांसाठी हेवाळे-बांबर्डे येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण सहाव्या दिवशी माजी आमदार वैभव नाईक यांच्या मद्यस्थीनंतर व वनविभागाच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले.
माजी आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सायंकाळी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील, ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभाप्रमुख रुपेश राऊळ, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, काँग्रेसचे जिल्हाचिटणीस सुभाष दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) संदीप गवस, मिलिंद नाईक, विनिता घाडी, संतोष मोर्ये, जेनिफर लोबो उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. संबंधित मागण्यांवर नियमानुसार व कायदेशीर तरतुदींनुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन वनविभागाच्या वतीने देण्यात आले. जंगली हत्तींसह अन्य वन्यप्राण्यांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे शेती करणे कठीण झाले असून, नुकसानभरपाई मिळविताना येणाऱ्या अडचणी आणि पंचनाम्यांमध्ये कथित अनियमितता झाल्याच्या आरोपांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर दौलत राणे, सिद्धेश राणे आणि मदन राणे यांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.
वन्यप्राण्यांमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे, प्रलंबित नुकसानभरपाई आणि अन्य संबंधित विषयांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, तसेच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन वनविभागाकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी सहाव्या दिवशी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








