
वैभववाडी : नगरपंचायतीच्यावतीने वैभववाडी शहराचा विकास आराखडा बनविला जात आहे.परंतू याबाबत जनता अनभिज्ञ आहे.जनतेला विश्वासात घेऊनच शहर विकास आराखडा बनविण्यात यावा.जनतेच्या मनातील संभ्रम दूर होईपर्यंत याला अंतिम मान्यता देण्यात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन नगराध्यक्षा नेहा माईणकर व नगरपंचायत प्रशासनाला दिले आहे.
नगरपंचायतीच्यावतीने शहर विकास आराखडा बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. याबाबत मनसेने नगरपंचायतीचे लक्ष वेधले आहे.शहर विकास आराखडा सर्वत्र प्रसिद्ध करणे गरजेचे होते.परंतू तसे न करता तो केवळ नगरपंचायतीच्या कार्यालयातच चार दिवस प्रसिद्ध केला.या विकास आराखड्याबात सर्व जनता, व्यापारी, प्रतिष्ठीत नागरिक व लोकप्रतिनिधींना याबाबत कुठलीच माहीती देण्यात आली नाही.यामुळे याबाबत हरकती कुठे घ्यायच्या याबाबत शहरवासीमध्ये संभ्रम आहे.
स्थानिक नगरसेवकांनी यांचा अभ्यास करून नागरिकांना यांची माहिती देणे गरजेचे होते परंतु त्यांनीही माहिती दिली नाही. यामुळे शहरात नेमकी विकास कामे कुठे होणार आहेत.नगरपंचायतीचा आराखडा कसा आहे याबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.त्याकरिता योग्य पद्धतीने या आराखड्याची प्रसिद्धी करावी.जनतेच्या शंकाच निरसण होत नाही तोपर्यंत आराखड्याला अंतिम मंजुरी देऊन नये अशी मागणी मनसेने केली.यावेळी माजी तालुका अध्यक्ष सचिन तावडे,रुपेश वारंग,दिपक पार्टे,प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.