
दोडामार्ग : तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे पाणी गोवा राज्यातील विवीध भागात शेती, व औद्योगिक विकास प्रकल्पांना पुरवठा करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात असून यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र अगदी याउलट तिलारी प्रकल्पासाठी घरदार, जमीन जुमला, शेतीबागायती यांचा त्याग करून दहा गावाचे पुनर्वसन शासनाने केले, त्यांच्या मुलभूत प्रलंबित प्रश्नाकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही, या प्रकरणी आपण जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधू असा शब्द प्रकल्पग्रस्त लोकप्रिनिधींना दिला आहे.
लवकरच जिल्हाधिकारी यांचेकडे याप्रश्नी पुनवर्सन गावठाण सरपंच, प्रतिनीधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचीही माहिती ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दोडामार्ग येथे दिली.
दोडामार्ग तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत होती, येथील तिलारी प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या त्याच्या मागण्या व अडचणी याबाबत त्यांनी शिवसेना तालुका कार्यालयात दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी हत्तीकडून सुरू असलेली शेती बागायती नुकसानी दिवसेंदिवस वाढतच आहे. याची नुकसान भरपाईची मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. माञ वाढत्या वन्य प्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे भविष्यात याबाबतीत ठोस कार्यवाही झाली पाहिजे. यासाठी शेतकरी वर्गातून कायम स्वरुपी निर्णय घेण्याबाबत आपण पुढाकार घेणार आहे, त्यासाठी या भागांतील शेतकरी प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक याचेशी संपर्क साधून मते जाणून घेण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. इतकंच नव्हे तर याबाबत वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधून कार्यवाही सुरू केली असल्याचे त्यांनी या भेटीत सांगितल. तळकट परिसरातील शेतकरी वर्गाची मोठी हानी वन्य प्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे होत आहे. सुपारी, केळी, नारळ बागायती पिके धोक्यात आली आहे. आता हत्ती कळपाने धुडगूस घालत बागायती उध्वस्त केली आहे. याकडे वन विभाग यांचे लक्ष वेधण्यात येईल असेही म्हटले आहे.
तिलारी प्रकल्पग्रस्ताचे प्रलंबित प्रश्नाकडे आपण यापूर्वी गांभीर्याने लक्ष वेधून अनेक निर्णय घेण्याबाबत शासनास भाग पाडले आहे. अनेक मंत्री महोदय तिलारी प्रकल्पाच्या ठिकाणी आणून निर्णय घेतले . तिलारीतील शेतकरी वर्गातून शेत जमीन मिळावी या मागण्या संदर्भात तत्कालीन पालकमंत्री, जलसंपदा मंत्री, मदत व पूनर्वसनमंत्री यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. जमिनी ऐवजी रोख रक्कम एकरी रूपये ६८,९०० रुपये देण्यात आले. नव्याने गावठाणात ग्रामपंचायती व महसुली गाव घोषित करून अमलबजावणीसाठी प्रयत्न केले. आतापर्यंत पुरवण्यात येणाऱ्या नागरी सुविधा अद्यापही अपुऱ्या आहेत. पाल पुनर्वसन गावठाण कुडासे खुर्द, पाटये पुनर्वसन, सरगवे-आयनोडे आदी गावातील ग्रामस्थ भेटले. त्यांनी अनेक समस्या मांडल्या. अनेक जणांनी भुखड अदलाबदल झाले आहे, हद्द निश्चित नाही, जोड रस्ते संपादन केले नाहीत,दिलेल्या पर्यायी शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ते नाहीत बुडित क्षेत्रातील जमिनीत जाण्यासाठी रींग रोड व्हावा तसेच त्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याबाबत शासनास भाग पाडणार आहोत. याबाबतीत जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता यांचे सोबत चर्चा केली आहे. व अन्य समस्या बाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे लक्ष वेधून सरपंच व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाल, पाट्ये पुनर्वसनातील समस्या मांडल्या
पाटये गावचे पुनवर्सन सासोली या ठिकाणी नव्याने गावठाण क्षेत्रातील अनेक प्रश्न भेडसावत आहेत. भूखंड अदलाबदल झाले असून ते बदलून मिळावेत, मायनर कालव्याची कामे पूर्ण करावीत, बुडित क्षेत्रातील जमिनीत जाण्यासाठी रिगरोड व्हावा आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी सरपंच प्रवीण गवस, उपसरपंच, सदस्य ग्रामस्थ यांनी सविस्तर चर्चा केली त्यांना आपले निवेदन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिले. तर पाल पुनर्वसन कुडासे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत भेडसावणारे प्रश्न सोडविण्यात यावेत. जोड रस्ते आणि स्मशानभूमी रस्ता भूसंपादन प्रक्रिया तात्काळ व्हावी. तसेच अन्य प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी कुडासे खुर्द सरपंच संगीता देसाई यांनी केली.