तिलारी घाटात अपघाताचं सत्र सुरूच

रस्त्यातच क्रेन पलटी
Edited by: संदीप देसाई
Published on: January 25, 2024 05:59 AM
views 335  views

दोडामार्ग : तिलारी घाटात अपघात सत्र सुरूच असून या घाटात अपघातग्रस्त टेम्पोला बाहेर काढण्यासाठी आलेली क्रेनच पलटी होऊन अपघात झाला. रस्त्यातच क्रेन पलटी झाल्याने वाहतूकही ठप्प झाली. बधुवारी हा अपघात घडला. त्यामुळे एसटी बस सहीत इतर खासगी वाहने अडकली आणि प्रवाशांचीही मोठी गैरसोय झाली.

        मुंबईहून गोव्याला लोखंडी सामान घेऊन जाणारा तिलारी घाट उतरत असताना शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घाटात अपघात झाला होता. या अपघातात जखमी चालकास रुग्णालयात दाखल केले व टेम्पो तसाच ठेवण्यात आला होता. तो टेम्पो बाहेर काढण्यासाठी बुधवारी दुपारी एका क्रेनला पाचरण करण्यात आले. टेम्पो बाहेर काढून नेत असतानाच क्रेन अचानक पलटी झाली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले‌ नाही. मात्र रस्त्यातच क्रेन आडवी झाल्याने वाहतुक ठप्प झाली. दोन्ही बाजूला वाहनांची सर्दी झाली. कोल्हापूर व बेळगावहून या घाटमार्गे दोडामार्गच्या दिशेने येणाऱ्या व दोडामार्गहून बेळगाव व कोल्हापूरला जाणाऱ्या एसटी बसेस तसेच खासगी वाहने दुतर्फा अडकून राहिली. काही वाहनधारकांनी रस्त्याच्या एका बाजूने मार्ग‌ केला. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने मार्गस्थ झाली.  सायंकाळी उशिरानंतर अपघातग्रस्त टेम्पो हलविल्याने वाहतुक सुरळीत झाली.