तिलारी धरण भ्रष्टाचाराचे कुरण : अंकुश जाधव

कारवाई करण्याची पालकमंत्री नितेश राणेंकडे मागणी
Edited by: लवू परब
Published on: January 23, 2025 20:38 PM
views 95  views

दोडामार्ग :  तिलारी धरण हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. धरण पूर्ण झाले. मात्र भ्रष्ट अधिकारी कालव्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून मलिदा खाण्यात व्यस्त आहेत. कालवा फुटीचे ग्रहण यामुळेच लागले असून ज्याठिकाणी गेल्या वर्षी दुरुस्ती केली होती त्या उन्नेयी बंधाऱ्याच्या  उजव्या कालव्याची पाईपलाईन कोसळणे हे याचे उत्तम उदाहरण असून आता बस्स झाले. या भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे, अशा आशयाचे निवेदन जि.प. समाज कल्याण माजी सभापती अंकुश जाधव यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे दिले आहे.

तेरवण मेढे उन्नेयी बंधाऱ्याचा कालवा मंगळवारी घोटगेवाडी  येथे कोसळला. यामुळे घोटगे, परमे, घोटगेवाडी आदी परिसरात पाण्याचे  दुर्भिक्ष्य असणार आहे. केळी, माड आदी बागायती बरोबर हंगामी शेती होरपळणार आहे. मात्र बोगस निविदा काढून मलिदा लाटणाऱ्या अधिकाऱ्यांना याच्याशी काहीही देणे घेणे  नाही. त्यामुळे या कामाची चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर  निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली असल्याचे अंकुश जाधव म्हणाले. त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे  की, तिलारी जलसंपदा विभाग कोणाला पोसायचे काम करत आहे? कालवा स्वच्छता व देखभाल याकरिता दरवर्षी ३५ लक्ष रुपयांची निविदा काढली जाते. गेल्या वर्षी केर नाल्यावरती जवळपास २० लक्ष रूपये दुरूस्तीचे काम केले. तेथेच पुन्हा अधिकारी यांनी जादूची कांडी फिरवत कालवा स्वच्छता ठेका काम काढण्यात आले आहे. या टेंडरवरती कालवा निरीक्षक, क्लार्क, गेट चालू बंद करण्या करिता कामगार व स्वच्छता करण्यासाठी मजूर पुरवायचे काम आहे. परंतु चार परप्रांतीय मजूर कामावरती हजर आहेत. अन्य एकही कामगार कालवा देखभाल दुरुस्ती व मनुष्यबळ पुरवठा कामावरती हजर नाही. ही गंभीर बाब आहे. मग असे कालवे फुटणार आणि याला जबाबदार अधिकारी आहेत. त्यांची सखोल चौकशी व्हायला हवी. असेही श्री. जाधव म्हणाले.

काम न करता कामाची देयके दिली जातात. वारंवार कालवा फुटीचे प्रकार घडत आहेत. वर्ष पूर्ण व्हायच्या आत केर नाल्यावरील जलवाहिनी कोसळते. या दुर्घटनेचे विश्लेषण व चिकित्सा व्हायला हवी. बेजबाबदारपणे काम केले जाते. संबंधित काम करून घेणारे किंवा कामं पाहणारे अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. अधिकारी कामावरती जात नाहीत. दोडामार्ग मध्ये राहतात. तेथून ये-जा करण्यासाठी गाडीतुन फिरतात.  कोनाळकट्टा वसाहतीमध्ये, मुख्यालयात रहाणे बंधनकारक असताना दोडामार्ग मध्ये राहतात. प्रकल्प भत्ता घेतात. ठेकेदाराच्या गाड्या फिरवतात. दिवसातून चार वेळा धरणावरती जाऊन आले तरी गाडी पंधरा किलो मीटर फिरू शकत नाही. "बुचडे" नावाचे अधिकारी शंभर किलोमीटर गाडी फिरल्याची नोंद करतात. कारण दोडामार्गतून घेऊन येणे व परत नेऊन सोडणे यावरती गाडी ८० किलो मीटर फिरते. मुद्दा असा आहे की पैशांची कशी उधळण करावी हे तिलारी जलसंपदा विभागाकडून शिकावे. शेतकरी शेतात राबतोय. त्याच्या पिकाला आता पाण्याची गरज आहे. याचवेळी पाणी पंधरा ते वीस दिवस बंद राहणार हा प्रकार खेदजनक आहे. 'धरण उशाला व कोरड घशाला' असा बेजबाबदार अधिकारी यांच्या संगनमताने होत आहे, असा हल्लाबोल जाधव यांनी केला.

प्रकल्पबाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी जलसंपदा विभागाने माफ करावी व जी असेल ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी. केर नाल्यावरील जलवाहिनीची मुख्य अभियंता यांनी पाहणी करावी. जलसंपदा विभागाने या दोषी अधिकारी व निवृत्त अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी. तशी शिफारस सार्वजनिक बांधकाम विभागास करावी. तसेच संबंधित ठेकेदाराची जलसंपदा विभागात सुरू असलेली कामे त्वरित काढून घ्यावीत‌. केविलवाणीपणे यशस्वी बनवण्याचा बालिशपणा करणाऱ्या जलसंपदा विभागाचे त्रिवार अभिनंदन. असेही शेवटी श्री. जाधव  यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.