तुळस - वाघेरीत वाघाचा शेळ्यांवर हल्ला

Edited by: दिपेश परब
Published on: October 21, 2024 05:00 AM
views 587  views

वेंगुर्ला : तालुक्यातील तुळस वाघेरीवाडी येथील बाबू भागू खरात यांच्या घरी रविवारी रात्री ११ वाजताच्या दरम्याने वाघाने हल्ला करून जागीच ठार केले तर एका शेळीला आपला भक्ष्य बनवून जंगलात नेले. या दरम्यान याठिकाणी असलेल्या खरात यांच्या कुत्र्यावरही हल्ला करून त्यालाही ठार केले. या घटनेमुळे अतिशय गरीब परिस्थिती असलेल्या खरात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

    तुळस वाघेरी येथील डोंगर भागत हे ६० वर्षीय बाबू खरात व कुटुंब वास्तव्यास आहे. वाघाने हल्ला केलेली एक शेळी ही नुकतीच २ दिवसांपूर्वी व्हयाली होती. या शेळी पालनावरच खरात यांचा उदरनिर्वाह चालत असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान तुळस सोसायटी चेअरमन संतोष शेटकर यांनी याबाबत घटनास्थळी पाहणी करून वनविभागाला याची माहिती दिली असून तुळस सरपंच रश्मी परब व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. 

    यावर्षी जानेवारी महिन्यार खरात यांच्या २९ शेळ्यांना लाग नावाचा रोग येऊन त्या दगावल्या होत्या. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले होते. खरात हे राहत असलेल्या धनगरवाडीत जायला सुस्थितीत रस्ता नसल्याने वेळेत त्यांच्याकडे पशु वैद्यकीय पथक पोचू शकले नसल्याने त्या शेळ्यांवर उपचार होऊ शकला नव्हता. तुळस वाघेरी येथून धनगरवाडी कडे जाण्यासाठी ३ किलोमीटर अंतर असून लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.