गोपुरीत तीन दिवसीय निवासी शिबिर

कोकणात एनएसयूआयची संघटना बळकट करण्याचा मानस
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 11, 2026 18:26 PM
views 27  views

  • युवक-युवतींमध्ये विचारप्रबोधन व नेतृत्व विकासावर भर
  • एनएसयूआय प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांची माहिती

कणकवली : महाराष्ट्रासह कोकणातील जिल्ह्यांमध्ये नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू असून, त्याचाच भाग म्हणून गोपुरी येथे निवडक पदाधिकाऱ्यांचे तीन दिवसीय निवासी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. युवक - युवतींना संघटनेशी जोडून त्यांच्यात समाजसुधारकांचे विचार रुजविण्याचे काम सुरू असल्याची माहिती एनएसयूआयचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांनी दिली.

गोपुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष विलास गावडे, एनएसयूआयचे कार्याध्यक्ष विक्रांत देशमुख, अ‍ॅड. कौस्तुभ पाटील, अक्षय कांबळे, विनायक उर्फ बाळू मेस्त्री उपस्थित होते.

साळुंके पुढे म्हणाले, राज्यभरात युवक - युवतींना संघटित करून त्यांच्या विचारांना दिशा देण्याचे काम एनएसयूआयच्या माध्यमातून सुरू आहे. नव्या पिढीत महापुरुषांचे विचार रुजवून समाजाभिमुख नेतृत्व तयार करण्यावर संघटनेचा भर आहे. कोकणातील युवकांमध्येही सामाजिक जाणिवा वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

या निवासी शिबिरात राज्यातील सुमारे ५० निवडक पदाधिकारी सहभागी झाले आहेत.त्यांना जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज कसा उठवायचा, सोशल मीडियावर संघटनेची भूमिका कशी मांडायची, तसेच संघटनात्मक कौशल्ये कशी विकसित करायची याचे प्रशिक्षण दिले जात आहे. बेरोजगारीसारख्या गंभीर प्रश्नांवरही संघटना काम करत असून युवकांना संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

विलास गावडे म्हणाले,  एनएसयूआय हीच माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात आहे. या संघटनेतून मिळालेल्या अनुभवामुळेच पुढील वाटचाल शक्य झाली. जिल्ह्यात काँग्रेसची संघटना मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करत आहे.

गोपुरीला गांधी विचारांचा वारसा लाभला असून, या ठिकाणी आयोजित शिबिरातून सहभागी पदाधिकाऱ्यांना सामाजिक व राजकीय जाण अधिक दृढ होईल. राज्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करून कार्यकर्त्यांना दिशा मिळेल, असा विश्वासही यावेळी बोलताना त्याने व्यक्त केला.

अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांनी शिबिर आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. तसेच युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी हे शिबिर महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.