कणकवलीत बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडला

४५ हजारांचा मुद्देमाल लंपास
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 24, 2024 05:35 AM
views 399  views

कणकवली :  शहरातील विद्यानागर काॅलेज रस्त्यावरील डिचोलकर बिल्डिंग येथील डॉ. विकास एन. एम. यांच्या बंद असलेला फ्लॅट चोरट्यांनी फोडला. चोरट्यांनी हॉलमध्ये असलेल्या कपाटातील १५ हजार  व ३० हजार किमतीची सोन्याची चैन असा मिळून जवळपास ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी ९.१५ वा. सुमारास उघडकीस आली.

     विकास एन. एम. हे मुळ केरळ येथील असून ते येथील एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहेत. डिचोलकर बिल्डिंगच्या दुसर्‍या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहतात. विकास सोमवारी रात्री ८.४० वा. सुमारास फ्लॅट कुलूपबंद करून रुग्णालयात निघून गेले. मंगळवारी सकाळी ९.१५ वा. सुमारास घरी आलेल्या विकास यांनी पाहिले असता फ्लॅटची कडी उघडी दिसली. त्यांनी आतमध्ये जाऊन असता फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घडल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश शेडगे, सहाय्यक उपनिरीक्षक राजेश उबाळे, हवालदार विनोद सुपल आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. श्‍वनपथकाचे कर्मचारीही  दाखल झाले.  दरम्यान, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेंतर्गत ठसे तज्ज्ञांनीही घटनास्थळ गाठून ठसे घेतले.

    विकास यांनी फ्लॅटफोडीबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास कणकवली करीत आहेत.