
वैभववाडी : रेल्वे प्रवासात महिलेचे दागिने चोरणा-या संशयित चोरट्याला वैभववाडी पोलिसांनी केरळ येथून ताब्यात घेतले. निखील नारायण कुमार (वय-२८) असे संशयिताचे नाव आहे. सदर चोरी २२ ऑगस्ट २०२२ रोजी नांदगाव स्थानकात झाली होती. यामध्ये चोरट्याने महिलेचे सोन्याचे दागिने, रोकडसह १७ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. पोलिसांनी सापळा रचून संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
मीरा रोड ठाणे येथील पोन भगवती मडसामी ही महिला २२ ऑगस्टला गोव्याहून मुंबईकडे जात असलेल्या जामनगर एक्सप्रेसने प्रवास करीत होती. ही गाडी नांदगाव रेल्वेस्थानकामध्ये क्रॉसींगकरीता थांबल्यानंतर श्रीमती पोनभगवती यांची बॅग अज्ञात चोरट्याने चोरली.आर्चिणे रेल्वेस्थानकादरम्यान हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. बॅगेत ५६ हजार रूपयांची रोकड आणि १७ लाख २७ हजार रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने असा १८ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल होता. यासंदर्भात त्या महिलेने मीरा रोड पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली होती.हा गुन्हा तपासाकरीता आल्यानंतर गेले काही महिने वैभववाडी पोलीस तपास करीत होते.
दरम्यान, पोलिसांना नांदगाव रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित आढळून आला.पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करीत होते. सीसीटीव्हीतील संशयित आणि केरळमध्ये चोरीच्या गुन्हयातून सुटका झालेल्या संशयिताची छबी मिळती जुळती असल्यामुळे पोलिसांनी तपासाची सूत्रे केरळच्या दिशेने वळविली. तेथील केळगाव (जिल्हा कन्नुर) येथील जंगलमय भागात संतागिरी डोंगरामध्ये संशयिताचे घर असून तेथेच तो असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील, पोलीस कर्मचारी हरीष जायभाय, राहुल तळसकर, अजित पडवळ, संतोष शिंदे हे केरळच्या दिशेने निघाले. सोमवारी (ता.५ ) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सापळा रचून पोलिसांनी संशयित कुमार याला ताब्यात घेतले. त्याला मंगळवारी सकाळी वैभववाडी पोलीस स्थानकात आणले. दरम्यान पोलिसांनी त्याला कणकवली न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.