घोटगे शाळेसाठी उपोषण होणार

Edited by: लवू परब
Published on: August 14, 2025 20:02 PM
views 16  views

दोडामार्ग : घोटगे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ ची धोकादायक इमारत दुरुस्ती व शौचालय दुरुस्ती करणे या मागणीसाठी, तसेच तिलारी प्रकल्पाच्या पोट कालव्यातील पाणी घोटगे, वायंगणतड प्राथमिक शाळा व अंगणवाडीत शिरून मुलांना वारंवार त्रास होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने घोटगे ग्रामपंचायत व शाळेसमोर विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन स्वातंत्र्यदिनी उपोषणास बसणार असल्याचे निवेदन घोटगे सरपंच यांनी तहसीलदार यांना दिले आहे. 

दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, घोटगे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ ची इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीच्या दोन वर्ग खोल्यांचे छप्पर जीर्ण झालेले आहे. याच वर्ग खोल्यांवर माकडांचा उपद्रव सदैव चालू असतो. एका वर्ग खोलीत मुलांचा पोषण आहार केला जातो. त्या वर्ग खोलीचे छप्पर पूर्ण जीर्ण झालेले असून पावसाची गळती लागलेली आहे. ग्रामस्थांनी तात्पुरते प्लास्टिक कागद घालून वर्गखोल्या झाकून घेतलेले आहेत. स्वयंपाक करताना तसेच मुले जेवताना बऱ्याच वेळा छप्परावरील कौले खाली कोसळलेले आहेत. शाळेच्या इमारतीच्या छप्पराची दुरुस्ती करण्यासंदर्भात दोन वेळा प्रस्ताव गटविकास अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडे देण्यात आले. परंतु त्यावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही. भविष्यात या इमारतीपासून मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. प्राथमिक शाळेचे शौचालय पूर्णतः नादुरुस्त झाले असून मोडकळीस आलेले आहे. त्यामुळे ते वापरणे धोकादायक आहे शिवाय मुलींसाठी शाळेत स्वतंत्र शौचालय उपलब्ध नाही. त्यामुळे धोकादायक इमारत दुरुस्ती व शौचालय दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

प्राथमिक शाळा वायंगणतड व अंगणवाडी समोरून तिलारी प्रकल्पाचा पोट कालवा गेलेला आहे. पोट कालव्यातील पाणी शेतात जाण्यासाठी शाळेसमोर पाईपलाईन टाकून मोरी बांधण्यात आली आहे. परंतु तेथील पाईपना बरीच वर्षे झाल्यामुळे फुटलेले आहेत. त्यामुळे तेथे चिखल मातीचा गाळ साचलेला आहे. फुटलेले पाईप व चिखल मातीमुळे कालव्यातील पाणी शेतात न जाता शाळा व अंगणवाडीत घुसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना गेली दोन वर्षे त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तिलारी प्रकल्पाच्या उपअभियंता यांना सांगितले असता आज व उद्याचे सबब करत दोन वर्षे घालविली आहेत. त्यामुळे या विरोधात उपोषण छेडणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.