आरक्षणासाठी आरपारची लढाई खेळायची | हळदीचे नेरूरमध्ये लाक्षणिक उपोषण

Edited by:
Published on: November 02, 2023 20:16 PM
views 207  views

कुडाळ : आता मागे हटणे नाही. "अभी नही तो कभी नही" या उक्तीनुसार मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई खेळायची असा इशारा कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर चाफेली ग्रुप ग्रामपंचायतिच्या प्रांगणात देण्यात आला.

 मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सदर ठिकाणी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या प्रसंगी विविध समाज बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय पक्षांवर किंवा नेत्यावर टीका टीपणी न करता आपण मराठा आरक्षण मिळवन्याचा प्रयत्न करण्याचे ठरले. वैशिष्ट्ये म्हणजे या उपोषणाला मराठा बांधवासह ओबीसी, धनगर व दलित बांधवांनी सुद्धा सशर्थ पाठिंबा दिला.

     छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र बांधून रयतेचे राज्य निर्माण केलं. त्यात मराठा बांधवांनी शेती बाजूला टाकून छत्रपतींच्या आदेशानुसार शत्रूशी लढण्यास तलवारी हातात घेतल्या. अनेक वर्ष लढाया करून आपण सुरक्षित बनलो याची खात्री पटल्यानंतर राजानी त्यांना उदरनिर्वाहासाठी पुन्हा नांगर हाती घेण्यास सांगितले. पण त्याच मराठा बांधवांच्या पुढच्या पिढ्या आज आरक्षण नसल्याने दारिद्र्यात खितपत पडल्या आहेत. त्यांना आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळालेच पाहिजे अशा भावना सर्व थरातील लोकांनी व्यक्त केल्या.

    यावेळी माजी सरपंच दिलीप सावंत, सागर माडगूत, दिनकर माडगूत, वसोली सरपंच अजित परब सुनील निकम, सेवानिवृत्त पोलीस सतीश कवीटकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकर कोराणे आदींनी आपले विचार मांडले 

   विद्यमान सरपंच दीप्ती सावंत, उपसरपंच गणपत परब, रामचंद्र चाळके, तंटामुक्ती अध्यक्ष नंदू परब, सोसायटी चेअरमन रजनीकांत दळवी,सुधीर गुंजाळ, रितेश परब, कृष्णा नाईक, उदय सावंत,मोतीराम बांदेलकर ,रसिक परब,सागर नेरूरकर,धोंडी निकम आदी शेकडो बांधव उपोषण स्थळी बसले होते.उपोषण ठिकाणी देखरेख ठेवण्यासाठी पोलिस पाटील सतीश केरवडेकर आणि माणगाव दुरक्षेत्राची पोलिस कुमक हजर होती.