रेल रोको शिवाय पर्याय नाही ; प्रवासी संघटनेचा निर्धार

Edited by:
Published on: December 15, 2024 19:01 PM
views 222  views

सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीची बैठक श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे पार पडली. या बैठकीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या अपूर्ण कामासंदर्भात सखोल चिंतन केले गेले. संघटनेने आतापर्यंत घेतलेल्या मोहिमा त्यात मेल मोहीम, राष्ट्रपतींना पत्र मोहीम आदींचा आढावा घेण्यात आला. त्याच बरोबर काही महत्त्वाचे ठराव या बैठकीत पारित केले. त्यात प्रामुख्याने कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग हा मध्य रेल्वेला हस्तांतरित करावा असा एकमुखी ठराव घेण्यात आला. त्यानंतर सावंतवाडी येथील अपूर्ण टर्मिनससाठी जर कोकण रेल्वे महामंडळ आणि राज्य शासन निधीची तरतूद करण्यास असमर्थ असल्यास हे अपूर्ण काम केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेतून करावा त्यासाठी येथील खासदार आणि आमदारांनी योग्य तो पाठपुरावा करावा त्यासाठी संघटनेकडून संबंधित लोकप्रतिनिधींना सखोल,अभ्यासपूर्ण निवेदन देण्या संदर्भात चर्चा झाली.

सावंतवाडी स्थानकात मंगलोर एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, नागपूर - मडगाव एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस आदी गाड्यांना येत्या १५ दिवसात थांबा मिळावा, तसेच आजच्या घडीला कोल्हापूर - संकेश्वर - बेळगाव असा रेल्वे मार्गासाठी सर्वे सुरू आहे. काही महिन्यात त्या रेल्वे मार्गाचे काम देखील सुरू होईल. त्यामुळे सावंतवाडी ते संकेश्र्वर असा रेल्वे मार्ग होण्यासाठी योग्य तो प्रयत्न करावा जेणे करून कोकणातून बेळगाव आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळेल आदी ठराव घेण्यात आले. या मागण्या येत्या ३० दिवसात पूर्ण नाही झाल्या तर २६ जानेवारी २०२५ ला रेल रोको करण्यात येईल असे एकमुखी ठरवण्यात आले. त्याच बरोबर गाडी क्रमांक ०११५१/५२ मुंबई - करमळी विशेष गाडीचा सावंतवाडी थांब्यासाठी प्रयत्न करणारे आमदार नितेश राणे आणि कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक  शैलेश बापट यांच्याअभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनस संदर्भात मेल मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सचिव मिहिर मठकर यांनी यावेळी सांगितले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप निंबाळकर, सचिव मिहिर मठकर, संघटनेचे मुंबई अध्यक्ष श्री विनोद नाईक, सौ सायली दुभाषी, नंदू तारी,सुभाष शिरसाट , तेजस पोयेकर,स्वप्नील नाईक, रामकृष्ण मुंज, विहंग, भूषण, सागर आदी संघटनेचे पदाधिकारी आणि प्रवासी जनता उपस्थित होते.