
सावंतवाडी : पावसाळा सुरु होण्यास काही दिवस राहीलेले आहेत. पावसाळयापूर्वी तालुक्यातील सर्व भागातील विजवाहीनीवरील झाडांच्या फांद्या तोडणे गरजेचे असताना महावितरण कार्यालयाकडून दिरंगाई होत आहे. ही बाब गंभीर असून याची दखल घेणे गरजेचे आहे. तसेच कोकणांतील पाऊस हा मुसळदार असल्याने सर्वच जनजिवन विस्कळीत होते. त्याचप्रमाणे शहर व ग्रामीण भागातील ब-याच भागामध्ये विद्युत लोखंडी पोल सडलेले असल्याने मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्याहीदृष्टीने महावितरण कंपनी मार्फत त्वरीत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी केली.
गेले दोन दिवस पाऊस पडत असल्याने ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. याची जाणीव महावितरण कंपनीला असून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्यक्ष जबाबदारी म्हणुन अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध होत नाहीत. रोजंदारी कामगार यांच्यावर जाणीवपुर्वक जबाबदारी टाकुन अधिकारी आपली जबाबदारी टाळताना दिसतात. ही वस्तुस्थिती सत्य असून रोजंदारी कामगारांना ग्राहकांशी तसेच ग्रामस्थांना सामोरे जावे लागते. त्यात अधिकारी आपल्या कर्तव्यात कसुर करीत आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्राहक व ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेला आहे. याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहे. याबाबतीत ग्राहक व ग्रामस्थ यांच्यामार्फत काही चुकीच्या गोष्टी घडण्यास त्याला कार्यालयच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. नाहक जाणीवपूर्वक ग्राहकांना व ग्रामस्थांना त्रास देण्याचा प्रयत्न करु नये असा इशारा त्यांनी दिला. तर कार्यालयाकडून त्वरीत आठ दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास ग्राहक व ग्रामस्थांच्या रोषाला कारणीभुत ठराल, याची नोंद घ्यावी असा इशारा दिला.